धोनीने सनरायजर्सविरुद्ध होमवर्क चांगले केले होते

Dhoni

पहिल्या सातपैकी पाच सामने गमावल्यावर आयपीएल २०२० (IPL 2020) मध्ये आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला (CSK) मंगळवारचा सामना जिंकणे आवश्यकच होते आणि तसा त्यांनी सनरायजर्सवर (SRH) विजय मिळवला. ६ बाद १६७ अशी मर्यादित धावसंख्या उभारल्यावरही सुपर किंग्जने २० धावांनी हा सामना जिंकला. याचे श्रेय त्यांच्या गोलंदाजांना, विशेषतः फिरकी गोलंदाजांना जाते. ते पाहता धोनीने (M S Dhoni) या सामन्याआधी पक्के होमवर्क केले होते असे दिसून आले.

सीएसकेने या सामन्यात जगदीशनच्या जागी पीयूष चावलास (Piyush Chawla) संधी दिली. म्हणजे त्यांनी आपली फिरकी मजबूत केली. याचे कारण हे की, दुबईतील सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाज दुसऱ्या डावात अधिक किफायती ठरले आहेत. दुबईला प्रथम फलंदाजीच्या डावांमध्ये फिरकी गोलंदाजांनी षटकामागे ८.२३ धावा दिल्या आहेत. हेच प्रमाण दुसऱ्या डावातील फलंदाजीत ७.०४ धावा प्रतिषटक आहे. फिरकी गोलंदाजांच्या सरासरीतील फरक तर आणखीनच स्पष्ट आहे. पहिल्या डावात दुबईतील सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांची जी सरासरी ५४.१ आहे तीच दुसऱ्या डावात १९.१ अशी आहे. कदाचित हे ध्यानात ठेवूनच धोनीने मंगळवारी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असावा. शिवाय जगदीशनच्या जागी पीयूष चावला ह्याला घेण्याचे व तीन फिरकीपटू खेळवण्याचे कारणही तेच असावे.

तसं पाहिलं तर या डावात त्यांनी चावलास एकच षटक गोलंदाजी दिली; पण त्याच्याने धोनीला गरजेनुसार स्पेशालिस्ट गोलंदाज वापरण्याची मुभा मिळाली. केन विल्यम्सन सेट झालेला असताना धोनीने जलद गोलंदाजांना शेवटी राखून ठेवण्यासाठी पीयूषला १६ वे षटक दिले आणि त्या षटकात फक्त आठ धावा निघाल्या. चेन्नईकडे या सामन्यात सात गोलंदाज होते आणि ते सातही त्यांनी प्रभावीपणे वापरले. धोनीला फलंदाज बघून गोलंदाज लावण्याची मोकळीक मिळाली. दीपक चाहर व सॕम करन यांनी पहिली सात षटके टाकली आणि ड्वेन ब्राव्होला १४ व्या षटकात आणले गेले आणि तो यशस्वी ठरला. त्याने दोन विकेट काढल्या. १८ व्या षटकात लेगस्पिनर कर्ण शर्माने गोलंदाजी केली. विल्यम्सनला चेंडूच्या गतीचा फायदा घेत खेळायला आवडते हे धोनी जाणून होता. म्हणून त्याने फिरकी गोलंदाज आणलेला होता.

हा डाव यशस्वी झाला. विल्यम्सन त्याच षटकात बाद झाला आणि तिथेच चेन्नईचा विजय निश्चित झाला. त्यानंतर शार्दूल ठाकुरनेही १९ वे षटक उत्तम टाकले. आयपीएल २०२० मध्ये जसजसे सामने होत आहेत तसतशा विकेट संथावत चालल्या आहेत आणि फिरकी गोलंदाज महत्त्वाचे ठरत चालले आहेत. म्हणूनच धोनीने म्हटलेय की, या खेळपट्ट्या आमच्या संघासाठी सहायक आहेत. पण आम्ही एक जादा फिरकीपटू खेळवायचे कारण हे होते की आमचा एक देशी फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही.

तो म्हणतो की, आमच्या फलंदाजांनीही परिस्थितीनुरूप खेळ केला. १६० धावासंख्येचा बचाव करताना पहिली सहा षटके ‘पॉवरप्ले’ कसा जातो हे महत्त्वाचे असते. आमच्या जलद गोलंदाजांनी त्यात आपले काम चोख बजावले आणि नंतर फिरकी गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. म्हणून आमचा हा विजय जवळपास परफेक्ट विजय होता, असे धोनीने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER