मुंबईत करबुडव्यांच्या घरांसमोर वाजत आहेत ढोलताशे

BMC Mumbai

मुंबई :- मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांसमोर पालिका कर्मचारी ढोलताशे वाजवत आहेत. या करचुकव्यांच्या इमारतींचं पाणीही कापण्यात आलं आहे.

४ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यावेळी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या कमाईत घट होत असल्यावर बोट ठेवले होते. तसेच ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांकडून मालमत्ताकर वसूल केला जात नाही. यामुळे पालिकेला दरवर्षी ३३५ कोटींचं नुकसान होते. एकूण १५ हजार कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे, असे परदेशी यांनी लक्षात आणून दिले.

हे थकीत कर वसूल करण्यासाठी महापालिकेने ही धडक मोहीम सुरू केली आहे. वॉर्ड स्तरावर हे अभियान सुरू आहे. पालिकेने मालमत्ताकर चुकविणाऱ्यांची यादी तयार केली असून ही यादी संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. ही यादी पाहून मालमत्ताधारकांच्या घर आणि कार्यालयासमोर महापालिकेने ढोलताशे वाजवण्यास सुरुवात केली आहे. ढोलताशे वाजवल्यानंतर माईकवरून मालमत्ताकर भरण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.