गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात १० महिलांचा मृत्यू

बंगळुरु :- कर्नाटकाहून (Karnataka) गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला टिप्परने धडक दिल्यामुळे धारवाडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात १० महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी १७ महिला गोव्याला निघाल्या असताना हा भीषण अपघात (Accident News) घडला. कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला.

पहाटे ३ वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. या अपघातात १० महिलांचा जागीच मृत्यू झाला. प्रवासात झोपलेल्या असतानाच महिलांवर संक्रांत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण १७ महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अडकलेले १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या पाच महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघी जणींना किरकोळ दुखापत झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER