वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन

कोल्हापूर : वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात निर्णय झाले. परंतु त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी दिला.

इंदोरीकर महाराजांना काळे फासणाऱ्या महिलेचे नाक कापू; मनसेचा इशारा

तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक होऊन बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले होते. परंतु यावेळी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्याच्या निषेधार्थ स्थगित केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले. तत्पूर्वी टाऊन हॉल उद्यान येथून दुपारी बारा वाजता डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. महिलांची संख्या लक्षणीय होती. सीपीआर चौक, दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.