मुलींनी सिनेमात काम करू नये असे वाटत होते धर्मेंद्र यांना

Dharmendra did not want girls to work in cinema

बॉलिवुडमध्ये (Bollywood) काम करणारे कलाकार आपली मुलेही बॉलिवुडमध्ये यावीत आणि त्यांना यश मिळावे म्हणून प्रयत्न करीत असतात. काही कलाकारांनी तर आपल्या मुलांना लहानपणापासूनच सिनेमात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र बहुतेक कलाकार आपल्या मुलींना मात्र सिनेमात येऊ देत नसत. स्वतः 50 पार केली असली तरी कोवळ्या मुलींबरोबर नायक म्हणून पडद्यावर येण्यास तयार असलेले नायक आपल्या मुलींना मात्र घरातच ठेवत असत. आता हे चित्र बदललेले दिसत असले तरी काही वर्षांपूर्वी असे चित्र नव्हते. बॉलिवुडमध्ये हीमॅन म्हणून ओळख असलेले आणि आता सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असलेल्या धर्मेंद्र (Dharmendra) यांनाही त्यांच्या मुलींनी सिनेमात येऊ नये असे वाटत होते. स्वतः हेमा मालिनी यांनीच हे रहस्योद्घाटन एका कार्यक्रमात बोलताना केले. एवढेच नव्हे तर ईशा देओलने (Isha Deol), माझ्या वडिलांनी माझा एकही सिनेमा पाहिला नाही. गपचुप पाहिला असेल तर माहित नाही असेही या मुलाखतीत म्हटले होते.

धर्मेंद्रने पहिले लग्न झालेले असतानाही बॉलिवुडची ड्रीम गर्ल (Dream Girl) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनीसोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचा किस्सा अत्यंत वेगळा असल्याने त्याबाबत येथे विस्ताराने सांगणे स्थानाअभावी शक्य होणार नाही. पुन्हा कधी तरी त्याबाबत सविस्तर माहिती देऊ. लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमाला ईशा आणि अहाना या दोन मुली झाल्या. ईशा आणि अहाना या आईप्रमाणेच खूपच उत्कृष्ट क्लासिकल डांसर आहेत. आईसोबत या दोन्ही मुलींनी अनेक शो केले आहेत. आपल्या मुलींनी सिनेमात काम करू नये असे धर्मेंद्र यांचे स्पष्ट मत होते. एकीकडे सनी आणि बॉबीला लाँच करणाऱ्या धर्मेंद्र यांचे हे मत अनेकांना पटले नव्हते तसेच हेमा मालिनी यांनाही पटले नव्हते.

खरे तर ईशा आणि आहना या दोघींनीही लहानपणापासूनच आई-वडिल आणि सावत्र भाऊ सनी देओलला सिनेमात काम करताना पाहिले होते. त्या दोघी सेटवरही जात असत. सिनेमाचे ग्लॅमरस जग पाहून त्यांच्या मनातही सिनेमात काम करण्याची इच्छा उत्पन्न झाली होती. त्यातच हेमा मालिनीने या दोघींनाही घरातच डांसचे क्लासेस देण्यासही सुरुवात केली होती. दोघीही उत्कृष्ट क्लासिकल डांसर आहेत. धर्मेंद्र या दोघींनाही घरी डांसची प्रॅक्टिस करताना पाहात असत. त्यांना या दोघींनी डांस शिकू नये असे वाटत होते. त्यांनी हेमा मालिनीला याबाबत सांगितलेही होते आणि या दोघींनी सिनेमात काम करू नये असेही सांगितले होते.

मात्र मुलींची इच्छा पाहून हेमा मालिनी यांनी ईशाला सिनेमात काम करण्याची परवानगी दिली. धर्मेंद्र यांना ही गोष्ट आवडली नव्हती आणि त्यांनी सहा महिन्यांपर्यंत ईशाशी बोलणे टाळले होते. परंतु हेमा मालिनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने अखेर धर्मेंद्र यांनी ईशाला सिनेमात काम करण्यास परवानगी दिली. परंतु ईशा आई-वडिलांप्रमाणे यशस्वी होऊ शकली नाही. आज ईशा आपल्या संसारात मग्न असून आईसोबत क्लासिकल डांसचे कार्यक्रम करीत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER