राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन, अहमदपुरात अंत्यसंस्कार

dr-shivling-shivacharya

नांदेड : लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं नांदेड येथील एका रुग्णालायात निधन झालं. ते १०४ वर्षांचे होते.  अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे पार्थिव नांदेडहून अहमदपूर या ठिकाणच्या भक्तिस्थळावर नेले गेले आहे.

महाराज गेल्या चार दिवसांपासून  नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. काल (३१ ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती.

त्यानंतर हजारो भाविकांनी अहमदपूरजवळ गर्दी केली होती. राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत.  वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक येथील  त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. दरम्यान, “वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.

विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे. ” असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER