धारावीत कोरोना नियंत्रणासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला : चंद्रकांत पाटील

Chandra kant patil

कोल्हापूर : एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोना नियंत्रणाचं सगळं श्रेय सरकारने घेण्याची काहीही गरज नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच सरकारने कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, धारावीत सरकारने उत्तम काम केल्याचं कौतुक आहेच. मात्र, धारावीतील परिणाम सरकारने काम केल्याने झाला का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीव धोक्यात घालून स्क्रीनिंग केलं.

प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक सदस्याची तापमान, ऑक्सिजन, सॅच्युरेशन तपासणी केली. जे संशयास्पद वाटलं ते महानगरपालिकेला कळवलं. त्यांनी हे काम नगरपालिकेच्या मदतीनेच केलं. पण हे सर्व श्रेय सरकारचं बनण्याचं कारण नाही. मुंबईत कोरोना नियंत्रणात आला तर आम्हाला आनंदच आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण आणलं म्हणून भ्रष्टाचारावर बोलायचं नाही का? कोरोनाच्या कामाचं अभिनंदन करताना मागे जो भ्रष्टाचार झाला त्याचेही विषय काढू. वांद्रे येथे २७ कोटी रुपयांचं तात्पुरतं कोविड सेंटर का बांधलं? त्याच्यासमोर रिलायन्सचा ३,१०० बेड बसतील इतका मोठा हॉल होता. २७ कोटी खर्च करून तर १,१०० बसले. हे मुद्दे उपस्थित करावे लागतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केलं. चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक निधीचे व्याज ग्राहकास विभागाकडून जमा करण्याचा काढलेला फतवा चुकीचा असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

वित्त आयोगाचे पैसे केंद्रानं ग्रामपंचायतींना दिले ते राज्य सरकार कसे काय वापरू शकतं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वित्त आयोगाने तयार केलेल्या प्रस्तावावर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्कार करून घेतला. यात त्यांचं काहीही श्रेय नसल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. कोरोना काळात सुरू असलेल्या बदल्यांच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांची सोय लागावी यासाठी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाविरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला. कोरोना संपताच हे सगळे विषय विधानसभेत उपस्थित करणार आहे.

चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? या सगळ्यावर आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. पाच रुपयांची शिवभोजन थाळी केअर सेंटरमध्ये ३८० रुपयाला कशी? ही कंत्राटं कोणाकोणाला देण्यात आली? अशी विचारणा विधानसभेत करणार आहे, असेही पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER