काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा जुंपणार, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव

dharashiv-mentions-osmanabad-on-cms-twitter-handle

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (Twitter handle) औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यावरून शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस (Congress) समोरासमोर आली होती. या मुद्द्यावरुन बराच गदारोळही निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री कार्यालयाकडून उस्मानाबाद शहराचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा फोटो आहे. अमित देशमुख (Amit deshmukh) हे काँग्रेसचे नेते असल्यानं काँग्रेसला हे मान्य आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

‘धाराशिव-उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे,’ असं सीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावरून आता काँग्रेसची कोंडीकरण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला आहे.

नामांतराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांमध्येच एकमत नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व घडामोडी ताज्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आल्यानं नव्याच वादाला फोडणी मिळालीय.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पत्र लिहून औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER