प्रस्थापितांना धडा शिकवणारा कृष्णाकाठचा ढाण्यावाघ… बापू बिरु वाटेगांवकर

Bapu Biru Vategaonkar

कृष्णाकाठ आणि क्रांतीवीरांचं एक नातं आहे. कृष्णेच्या पाण्याचाच हा गुण म्हणावा लागेल. अन्यायाविरुद्ध बंड करुन उठणारे अनेक क्रांतीवीर इथं जन्मले. भारताला स्वातंत्र्य मिळालं पण कृष्णेच्या पाण्यानं काय हा गुण सोडला नाही. याच कृष्णाकाठी जन्मला एक ढाण्या वाघ ज्यानं कुऱ्हाड आणि बंदूकीच्या जोरावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या मनात धास्ती भरवली. गुन्हेगाराला शिक्षा आणि शोषिताला न्याय दिला. त्यांचं नाव बापू बिरु वाटेगांकर (Bapu Biru Vategaonkar) म्हणजेच आप्पा महाराज.

मुंबईतल्या भाईंचे आणि अनेक देशभरातल्या गुंडांचे त्यांच्या दहशतीचे किस्से तुम्ही ऐकले असतीलच, पण त्यातल्या कुणालाही सामान्यांनी देवत्व बहाल केल्याचं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही. पण बापू बिरु वाटेगावकर याला अपवाद ठरतात. कुऱ्हाडीच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या माणसानं संत पद कमावलं. आज त्यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणी त्यांचे स्मरण लोक गुंड म्हणून नाही तर आप्पा महाराज या नावानं केलं जातं.

सांगलीच्या बोरगावातली ही गोष्ट. साधारणतः पन्नास एक वर्षापूर्वीची. बापू बिरु वाटेगावकर साधा मेंढपाळ. कुणाला कधी वाकडं बोलणं नाही की कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर बापूनं पाय दिला नाही. या शांत स्वभावाच्या माणसाचं गाव मात्र दहशतीत होतं. रंगा शिंदेच्या दहशतीत. कुणाच्या कोंबड्या चोरून रात्री पार्टी, गरिबाच्या गोठ्यातली जनावरं विकायची, सुपाऱ्या घेवून खून, असा प्रकार बोरगावात वाढायला लागला होता. रंगा शिंदे त्या टोळीचा म्होरक्या. नंतर त्यांच्या टोळीची हिंमत एवढी वाढली की दिवसाढवळ्या बाईमाणसाच्या इज्जतीवर रंगा शिंदे हात टाकू लागला. त्याच्या पापाचा घडा भरत आला होता म्हणून की काय आप्पांच्या डोळ्या देखत हा प्रकार घडत असताना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. गावात पहिल्यांदा रंगा शिंदेला कुणीतर नडलं होतं. त्यामुळं चवताळलेल्या रंगा शिंदेनं गणपतीच्या मिरवणूकीत आप्पांच्या हत्येचा प्रयत्न करत असताना, आप्पांनी चाकूनं रंगाचा कोथळा काढला. साल होतं १९६६. आप्पांच्या हातूनं पहिला खून झाला. तिथून बापू जे फरार झाले ते २५वर्ष सापडलेच नाहीत.

रंगा शिंदेच्या खुनानंतर बोरगावच्या पंचक्रोशीत लोकांनी पुरणपोळीचं घरोघरी जेवण केलं होतं. लोकांच्या मनातली दहशत उतरली आणि ती जागा आप्पांच्या आदरानं घेतली. कुणीच साक्षीला पुढं आलं नाही. रंगा शिंदेच्या भावानं बदला घ्यायचा प्रयत्न केला तर आप्पांनी त्यालाही संपवलं. रंगाच्या मामानं बापूंना मारण्यासाठी बंदूक आणली पण आप्पांनी त्यालाही संपवलं. बोरगाव, जुनेखेड, वाळवा, ताकारी, रेठरे हरणाक्ष, बिचूद, शिरटे, येडेमच्छिंद्र, खरातवाडी परिसरात आप्पांच्या नावाचा दबदबा सुरु झाला.

आप्पांकडं बघून मनगट मेलेल्या पोरांच्या हाताला बळ आलं. रक्त सळसळायला लागलं. स्वतः अन्याय करायचा नाही, कुणी केला तर त्याला सोडायचं नाही. हे धोरण ठेवून ४०-५० तरण्याबांड खमक्या पोरांची टोळी आप्पांनी तयार केली. गावगुंडांमुळं होणारा जाच त्यांना सहन व्हायचा नाही. त्यांनी बारा खून केले असं म्हणलं जातं, पण पोलीत खासगीत सांगतात की आप्पांनी त्यापेक्षा जास्त खून केले होते.

आप्पांनी सत्य आणि न्यायाची कास कधी सोडली नाही. चुकीच्या मार्गानं जाणाऱ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी ठार केलं. कुणाच्या भाजीच्या देठाला पण आप्पांनी हात लावला नाही. आप्पांना मानणारे त्यांच्यासह संपूर्ण टोळीला भाकरी पुरवायचे. पोलीस माग काढत आले की खबर द्यायचे. नंतरच्या काळात आप्पांच्या नावानं चोऱ्या-माऱ्या, लुट-पाट व्हायला लागली. आप्पांनी चुकीच्या मार्गावर गेलेल्या स्वतःच्या टोळीतल्या पोरांनाही शासन केलं.

आप्पांच्या कर्तबगारीचे पोवाडे गायले जायचे. मंगला बनसोडेंचा तमाशा असो की बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा. त्यांनी आप्पांचं नाव महाराष्ट्रभर केलं. आप्पांना जनसामान्य तर मानायचेच पण पोलिस दलातलेही बरेच लोक त्यांना मानायचे. पोलिसांच्या बंदूकीची काडतूसं त्यांना पोहोच व्हायची म्हणजे विचार करा.आप्पांचं व्यक्तीमत्व काय होतं. आप्पा २५ वर्ष फरार राहिले.

इतके खून करुन सुद्धा आप्पांना फक्त रंगा शिंदेंच्या खूनासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षा भोगून आल्यानंतर आप्पा पूर्ण बदलले. त्यांना अध्यात्माची गोडी लागली. तरुणांना वाईट मार्गाला जाण्यापासून परावृत्त करु लागले. १६ जानेवारी २०१७ला वयाच्या ९८व्या वर्षी आप्पांनी देह ठेवला. आजही आप्पांच्या आठवणींने लाखोंचे डोळे पाणवतात.

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER