धनगर नेते लहू शेवाळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

धनगर नेते लहू शेवाळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : धनगर समाजाचे (Dhangar Community) नेते आणि जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे यांनी आज शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे कारण सांगताना ते म्हणाले – काँग्रेस सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा, संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. समाजातील पददलितांना न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहिला आहे.

लहू शेवाळे यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. टिळक भवन येथे लहू शेवाळेंच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, डॉ. वामसी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, आशिष दुआ, मा. आ. मोहन जोशी, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लहू शेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. एच. के. पाटील म्हणाले की, धनगर समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकातही हा समाज मोठ्या संख्येने आहे. काँग्रेस पक्षही या समाजाच्या पाठीशी नेहमीच उभा राहिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात सिद्धरामय्या यांना पाच वर्षं मुख्यमंत्रीही करून दाखवले. दोन्ही राज्यात धनगर समाजाचे प्राबल्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER