माझे डोहाळे पुरवा

Dhanshri Kadgoankar

हिरवीगार साडी, मायेने पोटावर ठेवलेला हात, आंबट खाल्ल्यानंतरचे विशिष्ट भाव आणि अर्थातच चेहऱ्यावर आलेलं तेज असा फोटो अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanshri Kadgoankar) तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो म्हणजे तिने नवरा दुर्वेश देशमुख याला वाढदिवसानिमित्त दिलेली गोड भेट आहे. धनश्री लवकरच आई होणार असल्याने सध्या या दोघांच्याही आयुष्यात आनंदाला उधाण आले आहे. दुर्वेशच्या वाढदिवशी हे खास फोटो शेअर करत धनश्रीने तिच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण क्लिक केला आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नंदिता वहिनीसाहेब या भूमिकेतून धनश्री घराघरात पोहोचली. मालिकेची नायिका पाठकबाईला धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावणारी आणि त्यामुळेच ग्रे शेड असलेली ही भूमिका धनश्रीने अत्यंत चांगल्या प्रकारे वठवली. खरंतर गंध फुलांचा गेला सांगून ही धनश्रीची पहिली मालिका. पण राणादाच्या वहिनीच्या रूपात धनश्रीचा अभिनय कमाल रंगला. नृत्याची आवड असलेल्या धनश्रीने डान्स रिअॅलिटी शोमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. लॉकडाउन काळात विविध रेसिपी करत ती सतत ऑनलाइन येत होती. पण सध्या मात्र ती होणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून गेल्यावर्षी नंदिताची एक्सिट झाली. तिच्या कटकारस्थानाचा घडा भरल्यानंतर तिला पोलिसांनी अटक केल्याचे दाखवले आणि मालिकेतूनही धनश्री ऑफस्क्रीन झाली. त्यानंतर तिने थोडा ब्रेक घ्यायचे ठरवले. आता धनश्री नव्या भूमिकेतून कोणत्या मालिकेत दिसणार अशी तिच्या चाहत्यांना प्रतीक्षा होती. पण धनश्री आता पुढचे काही दिवस तरी मालिका, सिनेमा यापासून दूर राहणार आहे. धनश्री सध्या घरातल्या सगळ्यांकडून डोहाळे पुरवून घेण्याच्या तयारीत असल्याने ती ऑनस्क्रीन दिसणार नाही.

धनश्री मूळची पुण्याची असून गरवारे कॉलेजमध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाले. कॉलेजमध्ये असतानाच ती नृत्य आणि नाटकाच्या प्रेमात पडली. अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी व्हायची. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेतील तिचा रांगडा लूक प्रेक्षकांना आवडला होता. तर ब्रेव्हहार्ट या सिनेमातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

सध्या मात्र धनश्री हातातील सगळे प्रोजेक्ट बाजूला ठेवून फक्त आई होण्याच्या आनंदाचे अनुभव घेत आहेत. तिला जे खावेसे वाटते ते खाऊन ती सगळयांकडून डोहाळे पुरवून घेत आहे. नवऱ्याच्या वाढदिवशी त्याला सुखद धक्का देण्यासाठी धनश्रीने फोटोसोबत सोशलमीडियावर शेअर केलेल्या फोटोची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा आहे. या फोटोमध्ये धनश्री आणि तिचा नवरा दुर्वेश दोघंही दिसत आहेत.

सेलिब्रिटी म्हणून रोज टीव्हीवर दिसणारे कलाकार त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून ऑफस्क्रीन गेलेली धनश्री कोणत्याच नव्या मालिकेत अजून कशी दिसली नाही हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होताच. पण धनश्रीने तिचे खास फोटो शेअर केला आहे.

धनश्री पडद्यावरच जरी भूमिकेप्रमाणे वागत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच बिनधास्त आणि ग्लॅमरस आहे. लॉकडाउन काळात ती किचनमध्ये रमली होती. तिने केलेल्या विविध डिश ती सोशल मीडियावरही पोस्ट करत होती. एक वेगळा प्रयोग म्हणून तिने घरात पाणीपुरी बनवली आणि घरातल्या हॉलमध्ये तिने पाणीपुरीचा एक स्टॉलही लावला होता. कुटुंबासोबत तिने या घरातल्याच स्टॉलवर पाणीपुरीवर ताव मारला. खाण्याची आणि खिलवण्याची भारी हौस असलेल्या धनश्रीला बाळाची चाहूल लागल्याने आता ती डोहाळे पुरवून घेण्याची संधी कशी सोडेल बरं. त्यामुळे लॉकडाउनमध्ये ती सगळ्यांसाठी छान छान पदार्थ करत होती आता माझे डोहाळे पुरवा असं म्हणत सगळयांकडून लाड करून घ्यायला तयार झाली आहे.

ही बातमी पण वाचा : अनन्याने शिकवली शिवानीला प्रेमाची नवी भाषा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER