
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. असे असले तरीही या पोस्टनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती या पोस्टमधून समोर आली आहे.
करूणा शर्मा (Karuna Sharma) नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असे मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत आहोत, असा खुलासा केला होता. यावरून आता वेगळेच राजकारण रंगले आहे. धनंजय मुंडे यांनी याचा कबुलीनामा फेसबुकवरच दिला आहे.
या कबुलीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्री राहण्याच्या पात्रतेचे नाहीत, आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा आरोप आता भाजपाचे नेते करू लागले आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी असे झाल्यास भाजपाचेच नेते टेन्शनमध्ये येतील असे सांगितल्याने राजकीय रंग चढू लागला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का? निवडणूक आयोग त्यावर कारवाई करू शकतो का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तीन मुलींची नावे दिलेली आहेत. मात्र, विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्य असल्याची माहिती दिली नसल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये कायदेशीर पत्नीच्या नावाचा आणि तिच्यापासून असलेल्या तीन मुलींचा उल्लेख आहे. आमदारकी रद्द होण्याबाबत काही तज्ज्ञांनी मते नोंदविली आहेत.
राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी यावर मत मांडले आहे. ते म्हणाले की, विवाहबाह्य संबंधांमधून जन्मलेल्या अपत्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्याचा कोणताही नियम नाही. यामुळे धनंजय मुंडे यांनी माहिती लपविली असे होत नाही. मुलांना आपलं नाव देणं म्हणजे त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात झाला पाहिजे असे नाही. यामुळे निवडणूक आयोग यावर कारवाई करेल असे वाटत नाही. परंतू याचा राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ जे के तांदुळकर यांनीही काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांनी उच्चन्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामुळे या प्रकरणावर जास्त बोलू शकत नाही. महिलेशी संमतीने संबंध व तिच्यापासून दोन मुले असल्याने, त्यांच्या शिक्षणाचा खर्च-नाव धनंजय मुंडे करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा होऊ शकत नाही. तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन मुलांची नाव न दिल्याने काही समस्या येणार नाही, असे ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला