धनंजय मुंडेंना अभय; समर्थनात महाविकास आघाडीची ‘बॅटिंग’

dhananjay munde & Mahavikas Aghadi

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने बलात्काराची तक्रार केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. महाविकास आघाडी मुंडेंच्या बाजूने सावध भूमिका घेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१४ जानेवारी) ला हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत पक्षातील इतर सहकाऱ्यांशी चर्चा करुन पक्ष म्हणून निर्णय घेऊ, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आहे की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पवार यांनी मांडली (Maha Vikas Aghadi leaders on Dhananjay Munde case).

धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर भाजपाचे नेते कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी यांनी, रेणू शर्मा हिने आम्हालाही ‘हनिट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला. या नंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मुंडे प्रकरणावर आज (१५ जानेवारी ) ला बैठक पार पडली. रेणूने धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत. मात्र, ही महिला ‘ब्लॅकमेलिंग’ करत असल्याची बाब समोर आली असल्याची चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे सध्यातरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.

… भाजपाने आधी स्वत:कडे बघावे : सुनील केदार

काँग्रेस नेते आणि पशू संवर्धन मंत्री सुनील केदार म्हणालेत, धनजंय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर चौकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपाने स्वत:कडे बघावं.

तिला ‘ब्लॅकमेलिंग’ करायची सवय – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. म्हणालेत, ज्या महिलने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन या महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे लक्षात येते. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही कारवाई करु.

राजीनामा तातडीने घेऊ नये : संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेऊ नये, अशी भूमिका मांडली. “कालपासून धनंजय मुंडे प्रकरणाला जी कलाटणी मिळाली आहे, तक्रारदार व्यक्तीबाबतही अनेक तक्रारदार आहे. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीबाबतचे प्रकरणही गंभीर आणि धक्कादायक वाटायला लागले आहे. ही एकच प्रवृत्ती नाही तर अशा अनेक प्रवृत्त्या आहेत ज्या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत”, असे राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER