
मुंबई :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंडे यांनी आरोप फेटाळले आपल्याला ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
या संदर्भात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांना रेणू शर्मा या तरुणीने ई-मेल द्वारे तक्रार केली. त्याची दखल घेत, सोमवारी रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे. इंदूर आणि मुंबईमध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्याशी अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे रेणू शर्मा यांनी म्हटले आहे तिच्या तक्रारीनुसार, २००६ मध्ये घरात एकटी असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे दर दोन ते तीन दिवसांनी तिच्यावर अत्याचार सुरू होते. याचे व्हिडीओही त्यांनी काढले. त्यानंतर वारंवार फोन करून प्रेमाची गळ घालण्यास सुरुवात केली. पुढे गायिका होण्यासाठी बड्या सेलिब्रिटी, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत भेट घालून बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप बाबतचे ट्विट देखील शर्मा यांनी केले आहे.
तरुणीने जीवाला धोका असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही हे ट्विट टॅग करून मदत मागितली आहे.
ही बातमी पण वाचा : सगळ्यांना सर्व आहे माहीत, बलात्काराच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा खुलासा
धनंजय मुंडे काय म्हणतात?
रेणू शर्मा, करुणा शर्मा यांचे सर्व आरोप खोटे, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. रेणू या करुणा यांच्या भगिनी आहेत. मी करूणा यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. मात्र २०१९ पासून करूणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत १२नोव्हेंबर २०२० रोजी सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतूने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खासगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्माविरुद्ध याचिका दाखल केली आहे.याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहे. ही याचिका पुढील आणखी सुनावणीसाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे मुंडे यांनी म्हटले आहे.
तथापि, कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार (Crime) केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, व श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमसचे पुरावे आहेत, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला