धनंजय मुंडे यांचा कोणत्याही क्षणी राजीनामा!

dhananjay-munde

‘धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च जाहीरपणे म्हटल्याने आता मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मुंडे यांनी काल दुपारी पवार यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली होती. त्याच वेळी, ‘माझ्यावरील आरोपांबाबत वस्तुस्थिती मी सांगितली आहे. आता आपला आदेश असेल तर मी एका क्षणात मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे मुंडे यांनी पवार यांना सांगितल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

स्वत: पवार यांनी मात्र मुंडेंनी त्यांच्याकडे राजीनामा देऊ केल्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादीच्या अन्य काही निवडक नेत्यांची आज दुपारी बैठक झाली आणि त्या बैठकीत मुंडे यांच्यावर झालेले आरोप, त्यांच्याबाबत पक्षाने काय भूमिका घ्यावी याबाबत चर्चा झाली. बलात्काराच्या आरोपांची चौकशी पूर्ण होऊन सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे योग्य राहील, असे मत या बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून ‘महाराष्ट्र टुडे’ला मिळाली आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कालच फोनवरून चर्चा झाली, असे वृत्त काही वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले होते.

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांनाही विश्वासात घेतले जाईल हे उघड आहे. राजीनामा दिलाच तर तो त्यांना ठाकरे यांच्याकडेच द्यावा लागणार आहे आणि मग तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला तर नियमाप्रमाणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविला जाईल. परस्पर संमतीने ज्या महिलेशी संबंध ठेवले, दोन मुलेही झाली, त्या मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वत:चे नावही दिले. त्या महिलेच्या बहिणीने धनंजय यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत, असे हे गंभीर प्रकरण आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्याबाबत आता काय निर्णय घ्यायचा हे आपण पक्षातील नेत्यांशी चर्चा करून ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याच वेळी धनंजय यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत हे खुद्द पवार यांनीच मान्य केल्याने आता त्यांचे मंत्रिपद जाणार असे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER