आज करुणा शर्माने केलेल्या आरोपावर धनंजय मुंडेंनी केला हा खुलासा

Dhananjay Munde - Karuna Sharma

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनी आज मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांवर वृत्त प्रक्षेपित झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे.

धनंजय मुंडे खुलाश्यात नेमकं काय म्हणाले?

आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो. श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमूद केले आहे. सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. )

त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणून नियुक्तीसुद्धा केली आहे.

सदर मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असून 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत आणि निर्णयार्थ आहेत. असे असताना आणि सहमतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे.

मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधीपक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसुन येतोय. कृपया सदर बाब ही न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही.

कृपया ही वस्तुस्थिती आणि न्यायालयीन प्रकरण आणि एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER