धनंजय मुंडेंना संरक्षण देण्याची गरज, त्यांचा तातडीने राजीनामा घेऊ नये – संजय राऊत

Sanjay Raut-Dhananjay Munde

मुंबई:- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज प्रसारमाध्यमांशी चर्चा करत धनंजय मुंडेंची पाठराखण केली. कोणावरही गुन्हा दाखल करण्यापूर्वी योग्य चौकशी व्हावी, सत्यता जाणून घेण्यासाठी एसीपीसारख्या समकक्ष महिला अधिकाऱ्याकडून याची चौकशी व्हावी, सत्य बाहेर आल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी रोखठोक भूमिका घेत पवारांनी मुंडेंची पाठराखण केली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पवारांच्या भूमिकेचं समर्थन करत प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीविरोधातच अनेक आरोप, हे प्रकरण गंभीरच नाही तर धक्कादायक आहे. हा हनीट्रॅपचा प्रकार असून महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत नव्हता. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. त्यामुळे सर्वंकष तपास होण्याची गरज आहे. विरोधी पक्षाने यांचे भान ठेवावे, आपणही सत्तेत असल्याचं ध्यानात ठेवावं. कोणालाही आरोपी करण्याचं आधीच ठरवलं जातं. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. हा मंत्र सर्वांसाठी लागू आहे. खासकरून बेताल विरोधी पक्षाला लागू आहे. हमाम में सब नंगे है, याचं भान प्रत्येकानं ठेवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात लग्नासंदर्भातील माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या आरोपाच्या संदर्भाने संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला. तसेच कोणीही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये. धनंजय मुंडेंना संरक्षण देण्याची गरज आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात येऊ नये, असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत सपत्नीक पवारांच्या घरी, ईडीचा फास सैल करण्याबाबत घेतला सल्ला?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER