
मुंबई : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे माझे आक्षेापार्ह फोटो-व्हिडीओ आहेत म्हणून मी इतके दिवस गप्प होती, असे मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा (Renu Sharma) हिने एका वृत्तवाहिनीला सांगितले.
रेणू हिने या मुलाखतीत तिची बाजू मांडली. आरोप केला, धनंजय मुंडे यांनी २००६ पासून (मधली काही वर्ष सोडली तर) माझा वापर केला आहे. माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या परिस्थितीचा त्यांनी गैरफायदा घेतला.
व्यक्ती म्हणून जगायचे नव्हते, हे त्यांना माहिती होते. याच माझ्या परस्थितीचा त्यांनी फायदा घेतला. मात्र माझे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्याकडे असल्याने मी एवढे दिवस गप्प होते. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आम्ही तक्रार दाखल करायला गेलो त्यावेळी आम्हाला चार ते पाच तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं. मीडिया आली त्यावेळी आमची तक्रार नोंदवण्यात आली.
भाजपा (BJP) नेते कृष्णा हेगडे यांनी केलेले आरोप खोडून काढताना ती म्हणाली, कृष्णा हेगडे यांचा मी आदर करते. प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत मी त्यांना भेटली होती. त्यांनी स्वतः माझ्याशी बोलणे सुरू केले होते. मात्र आता ते असे का बोलत आहेत हे मला माहिती नाही. कदाचित धनंजय मुंडे यांचे ते मित्र असल्याने असे बोलत असतील. तिने कृष्णा हेगडे यांच्याशी झालेले व्हॉट्सअॅप चॅटही दाखवले.
मनिष धुरी (Manish Dhuri) यांना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान
मनिष धुरी यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना रेणू म्हणाली, मी स्वत: कामानिमित्त मनिष धुरी यांची भेट घेतली होती. टेलिव्हिजन कॉर्पोरेशनतर्फे माझे एक गाणे रिलीज होणार होते. मात्र त्यांनी माझं गाणं ठेवून घेतलं होतं, रिलीज करत नव्हते किंवा परत करतही नव्हते. या विषयासंबंधी मी मनिष धुरी यांची मदतीसाठी भेट घेतली होती. त्यानंतर ते दारु पिऊन रोज मला फोन करत होते. मनिष धुरी चुकीच्या गोष्टी सांगत आहे. मी त्यांना कधीही ब्लॅकमेल केले नाही. त्यांनी सिद्ध करावे मी त्यांना ब्लॅकमेल केले, असे आव्हान तिने दिले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला