धनंजय मुंडे इन अ‌ॅक्शन : एका सरकारी अधिकाऱ्याला भरबैठकीतून हाकलले!

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंगळवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची शाळा घेतली. नगरपालिकेत बैठकीला सर्वच विभागांतील अधिकारी उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी एका अधिकाऱ्याला भरबैठकीतून हाकलून लावल्याचा प्रकार समोर आला. त्याचे झाले असे की, बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना अहवाल मागवूनदेखील सादर केला नाही. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे आणि नियोजन समितीवरील सदस्यांचा पारा चढला. येथे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडे बोल सुनावत धनंजय मुंडे यांनी गुट्टे यांना भरबैठकीतून हाकलून दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अधिकाऱ्यावर तातडीने निलंबन करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचित केले आहे. उत्कर्ष गुट्टे हे बीड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वेळी नियोजन समितीच्या बैठकीत गुट्टे यांना नगरपालिकेतील कामकाजाचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश नियोजन समितीने दिले होते. आज नियोजन समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी गुट्टे यांना अहवालाविषयी विचारणा केली असता कामाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची खोटी माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाकडून कसलाच अहवाल प्राप्त झाला नसल्याचे उघड झाल्यावर मुख्याधिकारी गुट्टे यांचा खोटारडेपणा उघड झाला. यावेळी नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच भडकले. गुट्टे यांच्या कामाचा पाढा इतर सदस्यांनीदेखील वाचून दाखविला. इथं कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडेबोल धनंजय मुंडे यांनी सुनावत मुख्याधिकारी गुट्टे यांना भरबैठकीतून अक्षरशः हाकलून दिले. टीव्ही-९ ने दिलेल्या वृत्तानुसार गुट्टे यांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी एकमुखी ठरावदेखील पारित करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER