छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक बांधकामावरून धनंजय मुंडे आक्रमक…

परवानग्या नव्हत्या तर पंतप्रधानांनी जलपूजन कशाला केले... हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे...

Dhananjay Munde

मुंबई :- देशाच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे… युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मुळात परवानग्या नव्हत्या तर पंतप्रधानांनी जलपूजन कशाला केले असा सवाल करतानाच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर या चर्चेत सहभाग घेताना धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहीले होते त्यात सुद्धा त्यांनी या स्मारकाचे कंत्राट कशाप्रकारे चुकीचे दिले आहे हे सांगितले आहे. याचा खुलासा सभागृहात व्हायला हवा अशी मागणी मुंडे यांनी केली.

हे सरकार परवानग्या घेत नाही. छत्रपतींचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाते आहे साधा पुतळा उभारला जात नाहीय हे लक्षात घ्या. सरकार स्मारकाची उंची कमी करते याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. सरकार याबाबत का भूमिका स्पष्ट करत नाही अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी सरकारला केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत विनायक मेटे यांनी दिलेल्या पत्राचा आणि कामाला स्थगिती का आली आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. आमदार सतीश चव्हाण यांनीही यावेळी भूमिका मांडली. यावर सरकारतर्फे भूमिका मांडली जात नसल्याने विरोधी आमदारांनी गोंधळ घातल्याने सभापतीनी सभागृहाचे कामकाज तहकुब केले