धनंजय मुंडे आणि करुणातला लवकरच वाद मिटणार ? दोघांकडून मध्यस्थाची नियुक्ती

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) आणि त्यांची लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांच्यामधील वाद लवकरच मिटणार आहे. दोघांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती केली आहे. दोघांनीही वकिलांमार्फत संमतिपत्र दाखल केले असून अटी आणि शर्तींची पूर्तता बाकी आहे. मध्यस्थीचा खर्च धनंजय मुंडे स्वतः उचलणार आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर वाच्यता केली होती. धनंजय मुंडे यांना लिव्ह-इन पार्टनर करुणा शर्मांपासून दोन मुलं आहेत. त्यांच्यासोबत असलेले वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती केली आहे.

करुणा शर्मांविरोधात (Karuna Sharma) धनंजय मुंडे यांनी डिसेंबर 2020 मध्ये उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. करुणा यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. यामध्ये त्या स्वतः, धनंजय मुंडे आणि त्यांच्या दोन मुलांचे फोटो होते. त्यामुळे धनंजय मुंडेंनी कोर्टात धाव घेत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे निर्देश करुणा शर्मांना देण्याची विनंती केली होती. धनंजय मुंडे यांनी करुणांकडून नुकसानभरपाईचीही मागणी केली होती. धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग आणि करुणा शर्मा यांचे वकील ए. आर. शेख यांनी न्यायालयात संमतिपत्रक दाखल केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती झाली असून दोघांनाही त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER