धनंजय महाडिक यांच्याकडे भाजपची महापालिका निवडणुकीची सूत्रे

Dhananjay Mahadik - Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सत्ता संपादनासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत भाजपची सूत्रे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हातीच राहतील, असे स्पष्ट संकेत आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजप ‘मोदी कार्डचाच वापर करून कोल्हापूरवासीयांकडे कौल मागेल, असे दिसते.

आज इंदोरीकर महाराज कोल्हापुरात : शिवाजी विद्यापीठात तणाव

महाडिक यांच्या उपस्थितीत महापालिकेत विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी निवडणुकीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावला जाईल, अशी घोषणाही माजी खासदार महाडिक यांनी केली. भाजप सर्व प्रभागांत निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करत आहे. थेट पाईपलाईन योजनेचा प्रलंबित प्रश्न भाजपच्या महापौरांच्या कारकिर्दीतून पूर्ण करून शहरवासीयांना स्वच्छ, मुबलक पाणी देऊ, अशी ग्वाहीही महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धाडसी निर्णय घेतले असल्याने जनता भाजपला मतदान करेल. राज्यात महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील प्रलंबित कामांना गती दिली. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला, असा धनंजय महाडिक यांचा दावा आहे. महाडिक यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाजपचे विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालय प्रवेशाच्या निमित्ताने महापालिकेत जाऊन आपला इरादा स्पष्ट केला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला चार ते पाच जागा कमी पडल्या. यावेळी आम्ही सर्व प्रभागांत निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.

यानिमित्ताने त्यांनी महापालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरही निशाणा साधला. थेट पाईपलाईनचा प्रश्न नऊ वर्षे प्रलंबित आहे, असा आरोप करत महाडिक म्हणाले, सत्ताधारी आघाडीने गेल्या पाच वर्षांत हा प्रश्न सोडवण्याची गरज होती. योजना पूर्ण कधी होईल याचा पत्ता नाही. पुढील निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यावर महापौर आमचाच होईल. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न त्यावेळी मार्गी लावू.