पोलिस महासंचालकांचा कोल्हापूर दौरा रद्द

Subodh Kumar Jaiswal

कोल्हापूर : राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांचा आज बुधवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा दौरा आता लांबणीवर पडला आहे.

पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयस्वाल प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने पोलिस दलाने जय्यत तयारी केली होती. पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. पोलिस ठाण्यांतर्गत कामकाजाचे पोलिस महासंचालक स्वतः मुल्यांकन करणार असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड अद्यावत करण्याबरोबरच प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न होते. तसेच पोलिस महासंचालक शहर व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना भेटी देऊन येथील कामकाजाची पाहणी करणार होते. मात्र आज बुधवारी सकाळी पोलिस महासंचालक कार्यालयातून हा दौरा काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे कोल्हापूर अधीक्षक कार्यालयात कळविण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला महासंचालक जयस्वाल स्वतः उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ते उद्या गुरुवारी दिल्ली येथील बैठकीसाठी जाणार असल्याने त्यांनी कोल्हापूरचा दौरा पुढे ढकलल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पुढील महिन्यात महासंचालक कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याचे समजते.