कृमिविकार – त्यावर आयुर्वेद चिकित्सा

Deworming - Ayurveda treatment on it

कृमी कोणत्या कारणांनी निर्माण होतात याविषयीचे आयुर्वेद विचार आधीच्या लेखात वाचले असेल. कृमीमुळे अनेक वेगवेगळे त्वचा व पाचनाचे विकार होतात. शरीर कृश दिसते. रात्री झोपेत दात एकमेकांवर घासणे. हात पाय झटकणे अशी अनेक लक्षण कृमी उत्पन्न झाल्यामुळे दिसतात. अशावेळी वजन व भूक वाढविणारी टॉनिक किंवा दूधात वेगवेगळ्या पावडर टाकण्यापेक्षा कृमी चिकित्सा उपयोगी पडते. त्यामुळे जंत नष्ट होऊन आपोआप भूक वाढते व शरीर पुष्ट होण्यास मदत होते.

ज्या कारणामुळे जंत निर्माण होताहेत ते कारण शोधून त्याचे सेवन न करणे प्रथम व मुख्य चिकित्सा आहे. बऱ्याच मुलांना माती खडू खाण्याची सवय असते. त्यामुळे पोटात जंत निर्माण होतात. या अवस्थेत तत्सम गोष्टी न खाणे गरजेचे आहे.

  • जेवणाचे काही नियम पाळणे खूप आवश्यक आहे. उदा.
  • जेवणापूर्वी व नंतर स्वच्छ हात पाय धुणे.
  • उघड्यावर ठेवलेले वा न झाकलेले अन्न न घेणे.
  • गोड पदार्थ चॉकलेट वा जंक फूड न घेणे.
  • शिळे, फ्रीजमधील अन्न, भूक नसतांना जेवणे वर्ज्य करावे.

जंत नष्ट होण्याकरीता सर्वात महत्त्वाची क्रिया म्हणजे पोट साफ होणे. केवळ जंताना मारणारे औषध देणे महत्त्वाचे नसून त्यासह शरीरातील जंत बाहेर काढण्याकरीता पोट साफ करणे खूप आवश्यक आहे. जंत निर्माण होण्याची सवय कमी होते. म्हणूनच जंत असेल तर लहान असो वा मोठे वैद्याच्या सल्ल्यानुसार पोट साफ करण्याचे औषध नक्की घ्यावे. एरण्ड तेल याकरीता उपयुक्त आहे. रोज रात्री काही दिवस एरण्ड तेल गरम पाण्यासह अथवा पोळीला लावून घेतल्यास पोट साफ होते. जंत बाहेर पडतात.

आहारात कडू तिखट व तुरट पदार्थाचा समावेश करावा. ओवा कृमीहर म्हणून सर्वात चांगले काम करते. ते तिखट कडू गरम असल्यामुळे जंतनाशक आहे. ओव्याचे पाणी, ओवा चूर्ण काळ्या मीठासह घेणे फायदेशीर ठरते. हिंग जीरे यांचा फोडणीत वापर करणे.

विडंग उत्कृष्ट कृमीनाशक आहे. वायविडंगाचे चूर्ण मधासह चाटण किंवा वायविडंग पाण्यात उकळवून काढा पिणे. कारले, मेथी, दूधी कडू पडवळ, मूग, आलं, मिरे यांचा वापर करावा.

माती खाण्याची सवय तोडण्याकरीता त्यात कडूलिंबाचारस किंवा वाय विडंगाचे चूर्ण मिश्रीत करून दिल्यास मातीविषयी व्देष निर्माण होऊन माती खाण्याची सवय तुटते. स्नानाकरीता कडूलिंब पानांचा वापर करावा. कृमी असल्यास काही पदार्थ खाऊ नये. उदा. पालेभाज्या, मांसाहार, दूध, गुळ, गोड पदार्थ फळे इ. यामुळे जंत वाढतात.

अशा पद्धतीने कृमी वा जंताची चिकित्सा विचार आयुर्वेदात केला आहे. जंताचा वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. जंताचा त्रास शरीराचे पोषणच होऊ देत नाही. योग्य पोषण, धातु योग्य स्वरुपात न बनल्यास शरीराची रोगप्रतिकार क्षमता, वृद्धी -विकास व्यवस्थित होण्यास बाधा निर्माण होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER