देवेंद्र यांच्या बाउंसर्सनी फोडला घाम

Mahavikas Aaghadi

badgeमहाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे विश्वासमत ठराव जिंकला. २८८ आमदारांच्या विधानसभेत सरकारच्या बाजूने १६९ आमदार आहेत हे स्पष्ट झाले. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना धरले तर हा आकडा  १७० होतो. शिवसेनेच्या नेतृत्वात दोन्ही काँग्रेसने स्थापलेल्या ह्या सरकारने आपली स्थिरता सिद्ध केली, असा आजच्या शिरगणतीनुसार झालेल्या मतदानाचा अर्थ आहे. भाजपने मतदानावर बहिष्कार टाकला. तयारीने आलेल्या विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचा कीस पाडत आक्षेप नोंदवले. बहुमत असले तरी सरकारला गाफील राहता येणार नाही याचे ट्रेलर पाहायला मिळाले.

दादागिरी नही चलेगी! – भाजप

पाच वर्षे सत्तेची ऊब मिळाल्याने येणारी सुस्ती भाजपच्या आमदारांमध्ये अजिबात दिसली नाही. सरकारचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्ष उमद्या मनाने सरकारचे स्वागत करील अशी सत्तानेत्यांची अपेक्षा होती. पण त्यांना रुद्रावतार पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस तर तुटून पडले होते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी टाकलेले बाउंसर्स खेळताना सत्ताबाकांवरील नेत्यांची त्रेधा उडाली. हे अधिवेशन नियमानुसार बोलावण्यात आले नाही याकडे लक्ष वेधताना देवेंद्र म्हणाले, राज्यपालांचा समन्स काढावा लागतो. तो निघाला नाही. हंगामी अध्यक्ष बदलल्याबद्दलही त्यांनी टीका केली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शपथ घेताना आईवडील, महापुरुषांची नावे तली गेली, शपथविधीच्या गांभीर्यात हे बसत नाही . नियमानुसार घेतली नाही म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली होती याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. पण सत्ताधारी काम रेटण्याच्या मूडमध्ये दिसले तेव्हा भाजप आमदारांनी सभात्याग केला. विश्वासमताच्या मतदानात भाग घेतला नाही. आपला आकडा कशाला उघड करायचा असा सोयीस्कर विचार भाजपने केला असणार.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेएवढेच विरोधी नेत्याच्या भूमिकेतही फडणवीस आक्रमक असतात हे दिसल्याने सत्ताधाऱ्यांना घाम फुटला असणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर मैदान आठवले. उद्धव म्हणाले, ‘मला विधानसभेच्या कामाचा नाही, मैदानातला अनुभव आहे. मात्र आजचा गोंधळ पाहता याच्यापेक्षा मैदानच चांगले.’

पहिल्याच दिवशी मैदानाची भाषा झाल्याने विधानसभा डिसेंबरच्या थंडीतही चांगलीच तापणार असे दिसते. उद्या विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आहे. भाजपनेही ती लढवण्याचे ठरवल्याने उद्या पुन्हा आखाडा गाजणार आहे.