नागपुरात देवेंद्र लाट

badgeभाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आपल्या रिंगणात असल्याचा फायदा नागपूर शहरातील सर्व सहाही जागांवर भाजपला मिळताना दिसतो आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा आठवडा उरला असताना हे चित्र आहे. २०१४च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता. तरीही पूर्ण नागपूर शहर भाजपने एकहाती खिशात टाकले होते. यावेळी तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून भाजप केव्हाच मोकळा झाला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप उमेदवारांना याचा फायदा मिळतो आहे. एकूण ६ जागांपैकी उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि कामठी ह्या तीन जागी चुरस दिसत असली तरी भावी मुख्यमंत्री नागपूरचा असल्याच्या हवेचा फायदा भाजपला मिळताना दिसत आहे.

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून फडणवीस उभे आहेत. राज्यात फिरायचे असल्याने नागपुरात सारखे येणे जमणार नाही हे सुरुवातीलाच फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर त्यांच्या प्रचाराची धुरा महापालिका सत्ता पक्षनेते संदीप जोशी आणि त्यांची टीम सांभाळत आहे. इथे लढतच नाही अशी भाजप कार्यकर्त्यांची तक्रार आहे. कॉंग्रेसला इथे उमेदवार मिळत नव्हता. शेवटी कॉन्ग्रेस-भाजप-आणि पुन्हा कॉन्ग्रेस असा प्रवास केलेले, भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले आशिष देशमुख यांना रिंगणात उतरवून कॉंग्रेसने स्वतःची सुटका करून घेतली. २००४ मध्ये फडणवीस यांनी आशिष यांचे वडील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांना हरवले होते. फडणवीस इथे पाचव्यांदा लढत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी ५८ हजार मतांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा त्यांना एक लाख मतांच्या लीडने जिंकवू असे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे.

पश्चिम नागपूर हा मुख्यमंत्र्यांच्या शेजारचा मतदारसंघ आहे. शेजारच्या हवेचा फायदा इथे मिळतो. इथे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांना भाजपने लढवले असून कॉंग्रेसचे नागपूरचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी त्यांचा सामना आहे. ठाकरे जोर मारत असले तरी भाजपच्या रणनीतीपुढे किती टिकतात त्याकडे लक्ष आहे.

नागपूर शहरात एकूण ६ मतदारसंघ आहेत. दक्षिण नागपूर मतदारसंघ सोडता युतीत कुठेही बंडखोरी नाही. येथे भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले आणि शिवसेनेचे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया हे दोन बंडखोर मैदानात आहेत. दक्षिणमध्ये आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून भाजपने माजी आमदार मोहन मते यांना संधी दिली. कॉंग्रेसतर्फे गिरीश पांडव आहेत. बंडखोरांच्या उडीमुळे इथे थोडी चुरस दिसते.

एकेकाळी कॉंग्रेसचा गड असलेल्या उत्तर नागपुरात गेल्या वेळचे वातावरण नाही. गेल्या निवडणुकीत बसपचे किशोर गजभिये यांना कॉंग्रेसच्या नाराज मतांची कुमक मिळाल्याने भाजपचे मिलिंद माने यांची ताकद वाढली आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचा पराभव झाला. यावेळी हवा वेगळी आहे. कॉंग्रेसच्या बंडखोरांना बसवण्यात श्रेष्ठींना यश मिळाले आहे. बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे स्वतः रिंगणात आहेत. कॉन्ग्रेस आणि भाजपने जुनेच उमेदवार उतरवल्याने येथे काट्याची टक्कर आहे.

पूर्व नागपूरचा किल्ला २००९ पासून भाजपचे कृष्णा खोपडे यांच्याकडे आहे. गेल्या वेळी ते ४९ हजार मतांनी विजयी झाले होते. चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नितीन गडकरी यांना मोठा लीड मिळवून दिला होता. कॉंग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्याशी त्यांची थेट टक्कर आहे. कामठी ह्या भाजपच्या हुकमी मतदारसंघात यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापून भाजपने खळबळ उडवून दिली. भाजपतर्फे टेकचंद सावरकर उभे आहेत. कॉंग्रेसने माजी आमदार यादवराव भोयर यांचे पुत्र सुरेश भोयर हा नवा चेहरा देऊन धक्का देण्याचा प्रयत्न चालवला आहे.