देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदच आभासी; महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर

Devendra Fadnavis & Anil Parab

मुंबई :- मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेल्या मदतीच्या  आकडेवारीसह माहिती दिली होती. त्यावर आज महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषदच आभासी होती, असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी आज दिले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष सडेतोड देतो आहोत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करू, असं केंद्रानं सांगितलं होतं. मात्र तसं काहीही झालं नाही, असंही परब यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही. आम्हाला कर्ज घेण्यासाठी कुणीही सल्ले देऊ नये, असंही परब यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी १७५० कोटी रुपयांचे गहू मिळाले, असं सांगितलं. मात्र, महाराष्ट्र सरकारला १७५० कोटींचे गहू मिळालेले नाहीत. गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही. स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच झाला आहे, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

भाजपाकडून आम्हाला मदतीची मोठी अपेक्षा होती. मात्र विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला. कोरोनाच्या काळात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र ते निव्वळ राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. तसंच मजुरांच्या तिकिटांचा खर्चही राज्य सरकारनेच केला.  विरोधक सहकार्याऐवजी संभ्रम निर्माण करत आहेत, असंही थोरात म्हणाले.

करोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. कोरोनाच्या संकटाशी महाराष्ट्र लढतो आहे. २५ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनला दोन महिने होऊन गेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी समर्थपणे काम करते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य पद्धतीने लढा देणं सुरू आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. महाराष्ट्र हे देशाचं व्यवसाय केंद्र आहे. आजही सात लाख लोकांना आपण भोजन देतो आहोत, अशी माहिती  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सरकारला कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. मुंबईची स्थिती सध्या काळजी करावी अशीच आहे. कोरोनाच्या संकटातून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. मात्र कुणाचीच गैरसोय होऊ नये.  आपण कार्य करतो आहोत, अशी ग्वाही थोरात यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER