तुमची मानसिकताच राजेशाही, म्हणून लोकांनी तुम्हांला घरी बसवल; मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

CM-Sharad Pawar

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाजनादेश यात्रा’ करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या यात्रेचा समारोप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचा एक ‘हिशेब’ चुकता केला. नाशिकमधील या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं.

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मी जनतेला पाच वर्षांच्या कामांचा हिशेब द्यायला निघालो आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून, शरद पवारांनी त्यांना टोमणा मारला होता. हिशेब देणं ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, असं त्यांनी खोचकपणे म्हटलं होतं. त्यावर, तुमची मानसिकताच राजेशाही आहे आणि म्हणूनच लोकांनी तुम्हाला घरी बसवलं, असं टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि हिशेब देणं हे सेवकाचं काम असतं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

आज महराष्ट्रात कॉंग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. मागील निवडणुकीत शिवछत्रपतीचा आशीर्वाद आणि मोदींजींचे नेतृत्व आपल्यासोबत होते. आता छत्रपतीचे वारस आपल्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पाच वर्ष प्रामाणिक सरकार चालवलं, भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. “आपण सोशल इंजिनिअरिंग अर्थात जाती-पातीच्या राजकारणात बसत नसतानाही, माझ्यासारख्याला मोदींनी मुख्यमंत्री केलं. या पाच वर्षात मी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे सरकार चालवलं, याबद्दल मोदीजींचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“भाजपच्या महाजनादेश यात्रेत माता बघिनींनी अभूतपूर्व स्वागत केलं. उज्वला योजनेने महिलांच्या डोळ्यातले आश्रू दूर केले. मी यात्रा काढली त्यावेळी शरद पवार म्हणाले मुख्यमंत्री हिशोब देत आहेत. पण तुमची मानसिकताच राजेशाहीची आहे. त्यामुळे लोकांनी सेवकाला निवडून दिलं. काँग्रेसचं महाराष्ट्रात अस्तित्वच नाही”. असं मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांकरता दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. नारपार,पिंजाळच्या माध्यमातून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांच्या हाती रोजगार द्यायचा आहे. १ कोटींपेक्षा जास्त युवकांना रोजगार दिला. नाशिकला हायब्रीड मेट्रो देतोय, डिफेन्स क्लस्टर देतोय. मोदीजीने सिखाया है आम्ही सेवक आहोत आणि सेवकच राहू. तुमचा जनादेश आम्हाला द्या, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं.