सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना, त्यांच्या भगव्यात भेसळ – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray.jpg

नागपूर : केवळ सत्तेसाठी ज्या शिवसेनेने (Shivsena) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत हातमिळवणी केली आहे. मग त्यांचा कुठला भगवा राहिलाच कुठे, त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशी जळजळीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. भगवा झेंडा हा आता शिवसेनेचा राहिलेला नाही. शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली. त्यामुळे शिवसेनेने भगव्या झेंड्याचा अपमान केला आहे, असे देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारपासून नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सुरू केला. यावेळी त्यांनी ‘टीव्ही-९ मराठी’शी संवाद साधताना शिवसेनेवर हल्लाबोल केला.

यावेळी ते म्हणाले की, चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० आणण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेनेने सत्ता मिळवली. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी घाणेरडे लिखाण केले, त्यांच्यासोबत शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे. त्यामुळे आता भगवा तुमचा राहिलेला नाही. सामान्य जनतेला वीज बिलात सवलत देण्याच्या आश्वासनावरून सरकारने घूमजाव केले. शेतकऱ्यांनाही वीज बिलात सूट मिळणार नाही. हा मुद्दा आम्ही प्रचारात उचलून धरू, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस सरकारच्या काळात महावितरण डबघाईला आल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागाने चांगले काम केले. आमच्या काळात थकबाकी असेल, याचा अर्थ आम्ही गरिबांना, शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. एकदा तुमच्या सरकारने काय केले आणि आम्ही काय केले, हे एकदाचे समोरासमोर येऊन स्पष्ट करा, असे थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

तर नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपकडेच कायम राहील, असा दावाही त्यांनी केला. नागपूर हा भाजपचा आणि नितीन गडकरींचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडी सरकारने पदवीधर आणि शिक्षकांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नागपूर मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व कायम राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER