हे सरकार आहे की तमाशा? कोण कुठला निर्णय घेतो ते दुसऱ्याला माहीत नाही- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

नागपूर :- ‘महाविकास आघाडीचं सरकार (MVA Govt) आहे की तमाशा? कोण कुठला निर्णय घेतो ते दुसऱ्याला माहीत नसते. मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान होत आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर पदधीवर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (२९ नोव्हेंबर) भाजपकडून पूर्व विदर्भ पदवीधर मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजप नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. या मेळाव्यात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी फडणवीस म्हणाले की, या सरकारने एकही काम केलं नाही. नागपुरात जे काम दिसत आहे ते नितीन गडकरी यांनी केलेलं दिसत आहे. केवळ आम्ही सुरू केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले. शेतकऱ्यांना दिलेलं वचन यांच्या लक्षात नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाचं वचन त्यांच्या बरोबर लक्षात आहे, असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

तीन पक्ष एकत्र येऊन भाजपला एकटं पाडू, असा या सरकारने प्रयत्न केला. मात्र भाजपवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. भाजपने कोरोना (Corona) काळातसुद्धा देशभरात झालेल्या निवडणुका जिंकल्या. शिवसेनेने विश्वासघात करत तीन पक्षांचे  सरकार स्थापन केले. आता या सरकारला एक वर्ष झालं. पण एक वर्षात आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘सामना’च्या पूर्ण मुलाखतीत धमकवणारी भाषा वापरली, असा आरोपही त्यांनी केला.

आम्ही ओबीसी मुलांना जगात चांगल्या ठिकाणी शिकता यावं यासाठी योजना आणली. हे मात्र काय करतात माहीत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करत आहेत. लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टींबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेला सगळं माहीत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढचे दोन दिवस पदवीधर निवडणुकीसाठी महत्त्वाचे  आहेत. नागपूरची ही जागा फार महत्त्वाची आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दोन दशके हा मतदारसंघ गाजवला. त्यांनी विकास करून दाखवला. आतादेखील नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी कोरोना काळात जमिनीवर उतरून कार्य करणारा, समाजात मोठं काम करणारा उमेदवार तुमच्यासमोर आहे, असंदेखील फडणवीस म्हणाले.

नागपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत

नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघावर (Nagpur Graduate Constituency Election) आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवत संदीप जोशी (Sandeep Joshi) यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी (Abhijeet Vanjari) यांच्यासाठीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जोर लावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमुळे २८ टक्के मतदार घटले, याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणासाठी फडणवीसांच्या हातात सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER