‘ठाकरे सरकार’ कोसळणार म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना फडणवीसांनी फटकारले

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचं काही दिवसातच विसर्जन होईल आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्रीपदी दिसतील असं सातत्यानं भाकीत करणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांचे खुद्द विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनीच आज फटकारले. गेल्या काही दिवसांपासून अनेक भाजप नेते ठाकरे सरकारला लक्ष्य करत भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा करत होते. या नेत्यांना आता खुद्द फडणवीस यांनीच फटकारलं आहे.

भाजप नेते आणि राज्यसभा खासदार राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यानंतर आज खासदार गोपाळ शेट्टी यांनीही फडणवीस लवकरच परत एकदा मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांना लगावला. दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांना गदा भेट दिली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, याचा प्रहार फक्त कोरोनाच्या लढाईसाठी करणार आहे. सध्या आमच्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाई महत्वाची असून सत्तेत येणं हा आमच्यासाठी महत्वाचा विषय नसल्याचे म्हणत सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कोरोना काळात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. हे सरकार लवकरच जाईल, असा दावा नारायण राणे यांच्यासह भाजपचे इतर नेते वारंवार करत होते. मात्र आता फडणवीस यांनीच कान टोचल्यानंतर तरी हे नेते याबाबतचं भाष्य करणं टाळणार का, हे पाहावं लागेल .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER