‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणात आता विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली जात आहे. राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. इतकेच नाही तर ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटासारखी या प्रकरणाची गत होईल, असे धक्कादायक विधान करत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पूजा चव्हाण प्रकरणात सरकार फार काही कारवाई करेल असं दिसत नाही. ‘नो वन किल्ड जेसिका’ या सिनेमासारखी या प्रकरणाची अवस्था होईल. हे सगळे ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे. हे प्रकरण दाबण्याचा सरकार यशस्वी प्रयत्न करत असल्याचे दिसते, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. तर संजय राठोड सध्या कुठे आहेत ते कुणाला माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस नोट काढत नाहीत. सरकार एरवी ट्विट करतं; पण आता का करत नाही? बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. सरकार जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप बावनकुळेंनी पत्रकार परिषदेत केला.

पूजा चव्हाणच्या आत्महत्याप्रकरणात काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे, असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे पूजाच्या आत्महत्याप्रकरणात नि:पक्ष चौकशी करून राठोड यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे. भाजप नेते चित्रा वाघ, अतुल भातखळकर या नेत्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि पोलिसांना थेट लक्ष्य करत, राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, पोलीस या प्रकरणी नि:पक्षपणे तपास करत नसल्याचेही भाजपने म्हटले होते.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक अहवाल सादर केला आहे. अहवालाच्या प्रती राज्याचे पोलीस महासंचालक तसेच राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नसल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER