खडसेंनी मला व्हिलन ठरवलं, कुणाच्या गेल्यानं पक्ष थांबत नसतो; फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis & Eknath Khadse

औरंगाबाद : भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मी फक्त देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्याला व्हिलन ठरविले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आरोप करून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे. पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं. आता ते जे काही सांगत आहेत. ते अर्धसत्य आहे. त्यामुळे योग्यवेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेल, असं सूचक विधान करतानाच कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नसतो, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या आरोपांवर भाष्य केलं.

एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबद्दल त्यांना काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या, असं सांगतानाच मला खडसेंच्या इतर आरोपांवर काहीही बोलायचं नाही. खडसे अर्धसत्य सांगत आहेत, मला त्यावर बोलायचं नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचं आहे, त्यांनी मला ठरवलं, असं ते म्हणाले.

पक्षातील एखादा कार्यकर्ता असो की मोठा नेता असो पक्षातून गेल्यावर त्याची निश्चितच झळ पोहोचते. पण भाजप हा मोठा पक्ष आहे. कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही, असा टोला लगावतानाच जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जनता भाजपसोबतच आहे, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपचे नेते आमच्याकडे येतील असं वक्तव्य केलं होतं. खडसेंच्या रुपाने ही सुरुवात झाली आहे का? असा सवाल केला असता ते जे काही म्हणतात ते म्हणू द्या. एकही आमदार भाजपमधून जाणार नाही. सर्व आमदार भाजपसोबतच आहेत, असं फडणवीस म्हणाले. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली आहे, असं पत्रकारांनी विचारताच ज्यांचं काही खरं नाही, ते लोक काहीही बोलत आहेत. खोतकर माझे मित्र आहेत. पण त्यांना कोण विचारतं का पक्षात. त्यांचं काही खरं आहे का?, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER