राम मंदिर निधी समर्पण अभियानात देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग; १ लाख १ रुपयांचा धनादेश सुपूर्द

Devendra Fadnavis

मुंबई :- अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपला सहभाग नोंदवत १ लाख १ रुपयांचा धनादेश समर्पित केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा धनादेश त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांना सुपूर्द केला.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाचा प्रारंभ १५ जानेवारी रोजी झाला होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार असून १२ कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्रांचे भव्य मंदिर साकार होतेय. यानिमित्ताने एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER