माझी जात ब्राह्मण असल्यामुळं मला टीकेचा धनी करा ; मात्र… – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षणाला (Maratha reservation) अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापू लागलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या मुद्द्यावर ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बिनधास्त उत्तरे दिली. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही आवडलेला नाही. पण न्यायालयानं त्यांचा निर्णय दिला आहे. या निर्णयावर आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काही लोक राजकीय हेतूनं  कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा त्याच्याशी संबंध नाही. काही लोकांना असं वाटतंय की माझी जात ब्राह्मण आहे. त्यामुळं मला टीकेचा धनी करा. मात्र मराठा समाजाला सर्व माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले, असं फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी जबाबदारीने वक्तव्य करणार. सत्ताधाऱ्यांनी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करणे टाळावे. काही लोक राजकीय हेतूनं  कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल हे बघत आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही. केंद्राला पक्षकार करणं याचिकाकर्त्यांच्या हातात. केंद्राला पक्षकार करून काही उपयोगही नाही. केंद्राकडं बोट दाखवणं ही पळवाट आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का? हे आपल्याला न्यायालयाला पटवून द्यायचे आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होत असताना आम्हाला वेगळा न्याय का? हा मुद्दा आपण आता मांडायला हवा.

इतर राज्यांप्रमाणे आपलाही कायदा टिकायला हवा. राज्य सरकार आपल्या अंगावर काहीही घेण्यास तयार नाही. स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील. अध्यादेशाबाबत विधितज्ज्ञांसोबत चर्चा केली जाऊ शकते, असंही फडणवीस म्हणाले. कुंभकोणीऐवजी थोरातांकडे केस द्यावी, त्यांनी उच्च न्यायालयात केस जिंकली होती, असंदेखील ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करावं याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन्ही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये. नेतृत्व दोघांनीही करावं. दोघांमध्ये नेतृत्वासाठी वाद नाही. त्यामुळं कुणी तसा वाद लावू नये. छत्रपती संभाजीराजे यांच्या भरतीसंदर्भातील वक्तव्यात वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारनं भरतीचा निर्णय घेऊ नये. अशा प्रकारचा निर्णय घेताना सर्व घटकांशी चर्चा करण्याची गरज आहे. राज्याची स्थिती गंभीर असताना असे निर्णय घेताना विचार करावा.

भरती करावी, मात्र आता घाई नाही. आपण ही स्थगिती हटवू शकतो का यावर विचार केला जावा. एक महिना उशीर झाल्याने कुठलाही फरक पडणार नाही. याबाबत चर्चा तरी करावी. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता भरतीचा निर्णय योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले. मराठा समाजात प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित अशी एक लढाई आहे. मराठा समाजातील एक मोठा घटक गरीब आहे, वंचित आहे. मराठा समाजातला एक वर्ग राज्यकर्ता आहे. तो समृद्ध आहे. मात्र दुसरा वर्ग उपेक्षित आहे, त्यांच्या मनात विस्थापित असल्याची भावना आहे.

मात्र यासाठी मराठा आमदारांवर खापर फोडणं अगदी चुकीचं आहे. कांद्यावर ज्या क्षणी निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला त्या क्षणी मी केंद्रीय मंत्री गोयल यांना फोन केला. निर्यातबंदीसाठी ही वेळ बरोबर नाही.  याबाबत केंद्रानं एक मेकॅनिझम तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना निर्यातबंदी लावणं चूक आहे. मी याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. यातून काही तरी योग्य निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER