मुख्यमंत्रिपदाबाबत न दिलेलं वचन लक्षात आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन लक्षात नाही? – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) एक वर्ष पुर्ण झालं या पार्श्वभूमीवर सामनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली. ही मुलाखत माध्यमांमध्ये सध्या गाजत आहे. या मुलाखतीवरून माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल केले आहेत.

“मुख्यमंत्रिपदाबाबत न दिलेलं वचन लक्षात आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन लक्षात नाही? शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही,” असा खोचक टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खास पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला प्रश्न केले आहेत. महाविकास आघाडीची आम्ही आज पोलखोल करणार असे फडणवीस यांनी थेट बोलूनच दाखवले.

आज आम्ही महाविकासाघाडीच्या एक वर्षाच्या कारभाराची पोलखोल करणार आहे. नुकतंच ठाकरे सरकारच्या 1 वर्षाच्या कामाची कार्यपुस्तिका म्हणजे काल न्यायालयाचे दोन निर्णय आले. त्यातील एक अर्णव गोस्वामी आणि दुसरा कंगना रनौतप्रकरणाचा होता. अर्णव गोस्वामी किंवा कंगना यांच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही, पण विरोधी विचारुन चिरडून टाकायचं याच्याशी तर आम्ही बिलकूल सहमत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला चपराक लगावली, आता कोर्टाला तुम्ही देशद्रोही ठरवणार का? असा प्रश्न भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

“पाच वर्ष सरकार चालवणार असे हे म्हणतात. तुम्ही चालवा पण १ वर्षात काय दिसलं? हे सरकार जनतेचा विश्वासघात करुन आलेलं आहे. माझ्याकडे 2 पानांची यादी आहे, या सरकारने केवळ स्थगिती देण्याचं काम केलं, कोरोनाकाळात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं,” असेही फडणवीस म्हणाले.

स्थगिती पलिकडे या सरकारकडे दाखवण्यासारखे काही केले नाही. आरे कारशेडवर स्थगिती हा निर्णय मुंबईकरांवर अन्याय करणारा होता, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही ;  देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER