काँग्रेसने डोळे वटारल्याने शिवसेनेने भूमिका बदलली – फडणवीस

Devendra Fadnavis on citizenship amendment bill and shivsena

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेने काँग्रेसच्या दबावात भूमिका बदलली का, असा प्रश्न भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकसभेत काल शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला होता; पण आज – हे विधेयक राज्यसभेत सादर होईल त्यावेळी शिवसेना त्याला पाठिंबा देईल की नाही हे मतदानाच्या वेळी कळेल, अशी संदिग्ध भूमिका घेतली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, लोकसभेत काँग्रेसने या विधेयकाचा विरोध केला होता. एवढेच नाही तर शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे.

शरद पवारांना माझ्या जातीबद्दल बोलावं लागतं यातच माझं यश: देवेंद्र फडणवीस

नागपूरच्या नियोजित विधिमंडळ अधिवेशनाबाबत सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, नागपूरचं अधिवेशन म्हणजे या सरकारची फक्त औपचारिकता आहे. नवं सरकार स्थापन होऊन १३ दिवस झाले आहेत. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

अधिवेशनात आम्ही प्रश्न विचारले तर मंत्री म्हणून उत्तर कोण देणार? नागपूरचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडे घेतलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही केली होती. मात्र ही मागणी सरकारनं मान्य केली नाही. जे अधिवेशन घेतलं जातं आहे ती केवळ औपचारिकता आहे. शेतकऱ्यांच्या मदतीवरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना मदत करणार होतं. त्या मदतीचं काय झालं? अजूनही शेतकरी वाऱ्यावर आहेत. त्यांना दिलासा कोण देणार? अजून या सरकारच्या मंत्रिमंडळाचाच पेच सुटलेला नाही. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं आहे. शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर विरोधी पक्ष सरकारसोबत आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.