“४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले”; अनंत हेडगे यांचा दावा

'महाराष्ट्र टुडे ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केलेली बातमी तंतोतंत खरी ठरली'....

Fadnavis

मुंबई : २३ नोव्हेंबर रोजी मोठी उलथापालथ होऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. पण ही शपथ काही उगाच घेतली नव्हती त्या मागं एक खास कारण होतं. राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामे आणि प्रकल्पांसाठी केंद्राकडून मिळालेला ४० कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ८० तासांचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला, असा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंत हेडगे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना हेडगे यांनी हा दावा केला आहे.

यावेळी हेडगे म्हणाले की, महाराष्ट्राला केंद्राने दिलेले ४० हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी आमचा माणूस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेलं? आमच्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, हा एक प्रश्न सगळेच विचारतात.

‘महाराष्ट्र टुडे ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केलेली बातमी वाचा’

फडणवीसांची रणनीती यशस्वी; चार तासात विकास निधी केंद्राकडे परत?

तसेच मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ४० हजार कोटी केंद्राकडून आलेला अतिरिक्त निधी होता. जर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आली तर या ४० हजार कोटींचा दुरुपयोग झाला असता. केंद्र सरकारच्या या पैशाचा वापर विकासासाठी केला गेला नसता म्हणून हे नाट्य केलं गेलं अशी माहिती हेगडे यांनी दिली. त्याचसोबत ही योजना पूर्वीपासूनच भाजपाने बनवून ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे ज्याठिकाणी पोहचवायचे होते त्याठिकाणी पाठविले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचविला असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.

दरम्यान, हेडगे यांनी केलेल्या दाव्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून तांत्रिक बाबी तपासण्याची शक्यता आहे. कारण निधी परत करतेवेळी देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी केंद्रातील आलेला अतिरिक्त निधी ते नियमाप्रमाणे पाठवू शकतात का? याचा संपूर्ण तपास वर्तमान सरकार करू शकते. मात्र फडणवीस यांनी नियमानुसार हा निधी परत केला असेल तर, फडणवीसांनी जनतेचा पैसा चुकीच्या हातात पडण्यापासुन वाचवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला विकासकामांच्या निधीसाठी वारंवार केंद्राकडे हात पसरावे लागतील हे नक्की.

विशेष म्हणजे याबाबतचे वृत्त सर्वात आधी महाराष्ट्र टुडे ने प्रकाशित केले होते. मात्र याबाबत कोणत्याही नेत्याने भाष्य केलं नसल्याने आमच्या बातमीला दुजोरा मिळाला नव्हता. आता मात्र माजी केंद्रीय मंत्र्याने याबाबत दावा केल्यानंतर महाराष्ट्र टुडे ने प्रकाशित केलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले असे म्हणणे गैर ठरणार नाही.