कायद्याचे राज्य नसल्याप्रमाणे घटना घडताना सरकारचे मौन अधिकच गंभीर – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : जालना येथील भारतीय जनता (BJP) युवा मोर्च्याचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलिसांकडून केलेल्या अमानुष मारहाणीमुळे चांगलेच राजकारण रंगले आहे. शिवराज नारियलवाले यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) पत्राच्या माध्यमातून केली आहे. तसेच राज्यात कायद्याचे राज्यच नसल्याप्रमाणे अशा घटना घडत असताना त्यावर सरकारचे मौन हे तर अधिकच गंभीर असल्याचे म्हणत टोलाही हाणला.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलं. जालना येथील भारतीय जनता युवा मोर्च्याचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना ९ एप्रिल २०२१ रोजी जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानुष, रानटी मारहाणीचा व्हिडीओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. शिवराज नारियलवाले हे ९ एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच सुमारास गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक धुडगूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. आपल्या समाजाबद्दल इतक्या आपत्तिजनक शब्दांत कुणी बोलत असेल तर त्याचे चित्रीकरण करणे एवढाच काय तो त्यांचा गुन्हा. पण त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हिडीओतून दिसून येते. गणवेशातील सहा आणि गणवेशात नसलेले दोन असे आठ पोलीस त्यांना घेरून अमानुष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावरसुद्धा मारहाण करण्यात आली.

रुग्णालयात धुडगूस घालणार्‍या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणजे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिविगाळ कॅमेराबद्ध केली म्हणून संतापाच्या भरात कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनीच कायदा हाती घेतलेला दिसून येतो. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश असणे, हे तर आणखी गंभीर आहे. जर नारियलवाले यांचा कुठे दोष असेल तर गुन्हा दाखल करून रीतसर कारवाई पोलिसांना करता आली असती. पण सराईत गुन्हेगारालासुद्धा मारहाण करण्यात येत नाही, अशा पद्धतीने नारियलवाले यांना मारहाण करण्यात आली. जवळजवळ दीड महिने नारियलवाले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते. शिवीगाळीचा व्हिडीओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. अखेर हे डीवायएसपी अ‍ॅट्रॉसिटीच्या एका प्रकरणात लाच घेताना सापडून निलंबित झाल्यानंतर त्या कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्यांनी हा प्रकार समोर आला. अन्यथा हा प्रकारही कधीच उघडकीस आला नसता. राज्यात कायद्याचे राज्यच नसल्याप्रमाणे अशा घटना घडत असताना त्यावर सरकारचे मौन हे तर अधिकच गंभीर आहे. विशेषत: राज्य सरकारविरोधात भाजपाचे कार्यकर्ते अथवा कुणी सामान्य माणसानेसुद्धा काही प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिली तर अशा व्यक्तींना कधी पोलिसांकडून तर कधी राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकार अलीकडच्या काळात प्रचंड वाढले आहेत. कायद्याचा धाकच उरलेला नाही. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button