वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis - Maharastra Today

पुणे : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. या घटनेवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधताना मोठे गौप्यस्फोट करत राज्य सरकारवर निशाणा साधला. मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. तसेच राज्य अस्थिर करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा दावा हस्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे. सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित असतानाही त्यांना सेवेत घेण्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आग्रह धरला होता. त्यावेळी मी वाझेंची फाईल अॅडव्होकेट जनरलना दाखवली होती. त्यावेळी त्यांनी मला वाझेंना सेवेत न घेण्याचा तोंडी सल्ला दिला होता. वाझे यांना उच्च न्यायालयाने निलंबित केलं आहे. त्यामुळे त्यांना सेवेत घेता येणार नाही. तो कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल, असं मला अॅव्होकेट जनरलनी सांगितले होते . त्यामुळे मी वाझेंना सेवेत घेतले नव्हते, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.

राज्यात सत्तांतर झाले . त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने त्याचे काही रिटायर अधिकारी सेवेत हवेत असं कारण दाखवून ठाकरे सरकारने वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं. आश्चर्य म्हणजे क्राईम इंटेलिजन्स युनिट हे अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. त्याचा प्रमुख हा पीआयचं असतो. असं असताना केवळ वाझेंसाठी पीआयची बदली करून एपीआय असलेल्या वाझेंना या विभागाचं प्रमुखपद दिलं. १६ वर्षे सेवेतून निलंबित असलेल्या वाझेंना ठाकरे सरकारने हे पद दिलं. त्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य केसेस त्यांच्याकडे देण्यात आल्या. वाझे शिवसेनेत होते. शिवसेनेचे प्रवक्तेही होते. त्यामुळे त्यांना केसेस दिल्यात का हे मला माहीत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

अंबानी यांच्या घराच्या बाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्याने एनआयएला यावं लागलं. यातला घटनाक्रम तुम्ही पाहा. धमकी देणं वगैरे या बाबीही यात आहेत. आज जे अधिकारी अटकेत आहेत, तेच या प्रकरणाचे तपास अधिकारी होते, हे सर्वांत गंभीर आहे. त्यामुळे एवढे पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांवर अविश्वास आहे, महाराष्ट्रद्रोह आहे, असं बोलणाऱ्यांनी वाझेंमुळे महाराष्ट्राची इमेज चांगली होते का याचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी राऊत यांना नाव न घेता लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER