चौकशीच्या आड विरोधी नेत्यांचे तोंड बंद होईल, असं वाटत असेल तर विसरा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis.jpg

उस्मानाबाद : आमच्या कार्यकाळात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला करायची आहे, ती त्यांनी जरूर करावी. मात्र चौकशी करून विरोधी पक्षातील नेत्याचं तोंड बंद होईल, असं वाटत असेल तर ते त्यांनी विसरून जावं, असं खुलं आवाहन माजी मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला दिल आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच एसआयटीमार्फत ही चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवारा संदर्भात राज्य सरकारला जी काही चौकशी करायची आहे, ती त्यांनी जरूर करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही काही मंत्रालयात सह्या करून टेंडर दिलेली कामं नाहीत. सहा लाख कामं त्याठिकाणी झाली आहेत. या सहा लाख कामांपैकी सर्व कामं ही विकेंद्री पद्धतीनं झाली. जिल्हाधिकारी याचे प्रमुख होते. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने, कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग यासर्व विभागांनी कामं केली. साधारणपणे एक लाखांपासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक पातळीवरच याचे टेंडर्स निघाले आहेत आणि ही कामं करण्यात आलेली आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भात मी मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, आमच्याकडे ७०० तक्रारी आल्या आहेत. सहा लाख कामांमध्ये सातशे तक्रारी म्हणजे अर्धा टक्का देखील नाही. म्हणजे, एकही टक्का तक्रारी येऊ नयेत. पण साधारणपणे जी काही सरकारी कामं होतात त्यात किमान पाच ते सात टक्के तक्रारी येत असतात. सहा लाख कामं होऊन अर्धा टक्काही तक्रारी त्यामध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे जाणीवपूर्वक याठिकाणी चौकश्या लावल्या जात आहेत.

मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो, जर सरकारला असं वाटत असेल की, अशाप्रकारे चौकश्याच्या आड विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल, तर त्यांनी ते विसरून जावं. विरोधी पक्षनेता हा जनतेकरताच काम करत राहणार आहे. शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर होऊ द्या. जलयुक्त शिवार योजनेचा किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला, हे आम्ही प्रत्येक गावात, तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांचं मत नोंदवणार आहोत. त्याचं आम्ही प्रदर्शनच मांडणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER