स्वातंत्र्यवीर सावरकरांवर तोंडसुख घेणाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांचे ‘हे’ आव्हान

Fadnavis-savarkar

नांदेड( प्रतिनिधी) :- भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधात देशभर माहोल निर्माण केला जात आहे. काही विरोधक तर सावरकरांची निंदानालस्ती करण्यात धन्यता मानत आहेत. या विरोधकांमध्ये हिमत असेल तर त्यांनी अंदमानात दहा तासांची काळया पाण्याची शिक्षा भोगून दाखवावे, आम्ही त्यांना पुरस्काराने गौरवू ,असे आव्हान माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

ही बातमी पण वाचा : समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिल्यामुळे तो प्रकल्प नक्कीच पूर्ण होईल – देवेंद्र फडणवीस

अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रताप पाटील चिखलीकर, कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, संस्थापक अध्यक्ष डॉ.प्र.दि.पुरंदरे, अध्यक्ष बालासाहेब पांडे, उपाध्यक्ष डॉ. सविता भालेराव, सचिव डॉ.कृ.म.जोशी, प्राचार्य सुधीर शिवणीकर, आ.राम पाटील रातोळीकर, आ.डॉ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, आ.भीमराव केराम, व्यंकटराव गोजेगावकर, प्रवीण साले, कैलास काला, माजी आमदार रामराव वडकुते, भाजपाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष ड.शिवाजीराव जाधव, संस्था सदस्य धनंजय जोशी, वनिता जोशी, गजानन मालेगावकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित होते. यावेळी स्वा.सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्तविक सचिव डॉ.जोशी यांनी केले. अध्यक्ष बालासाहेब पांडे यांनी संस्थेचा संघर्षपूर्ण इतिहास विषद करीत सुवर्ण महोत्सवी वर्षातील विविध उपक्रमांची संकल्प यादी वाचून दाखविली.

ही बातमी पण वाचा : हा मल्टीस्टारर नाही, तर हॉरर सिनेमा – देवेंद्र फडणवीस

खा.प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, मी विद्यार्थी दशेत यशवंत महाविद्यालय विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष होतो. त्यानंतर महाविद्यालय परिसरातत प्रथमच आलो आणि येथील वातावरण पाहून ऊर्जा मिळाली. आता या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असा विचार येतोय, परंतु तो काही कारणामुळे होऊ शकणार नाही. मात्र या संस्थेला सढळ हस्ते मदत करा असे निर्देश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला येथे येतानाच दिले. त्याचा एक भाग म्हणून मी 11 लाख रुपयांची मदत संगणक प्रयोगशाळेसाठी जाहीर करतो. याशिवाय आणखी काही मदत लागली तर नक्की देऊ.

प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस यांना मानवंदना देतो, असे नमूद करीत फडणवीस म्हणाले की, शहीद भगतसिंघ यांच्या मातोश्री विद्यादेवी यांच्या हस्ते अभिनव भारत शिक्षण संस्थेची पायाभरणी झालेली आहे, ही अभिमानाची बाब आहे. संघर्ष करीत ही संस्था व महाविद्यालय उभे राहिले आहे. मला आज या संस्थेत आल्यावर खूप अभिमान वाटतोय. यापुढेही संस्थेला जी मदत देता येईल ती जरुर देऊ.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा घेऊन हे महाविद्यालय उभे राहिले आहे. त्यातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी राष्ट्रवादाची शिकवण घेत विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आज काल सावरकरांविषयी देश पातळीवर दर्जाहीन टिप्पणी व टीका केली जात आहे. तत्कालीन इंग्रज राजवटीला सावरकरांचा एवढा धाक होता की, त्यांनी सावरकरांना जीवनात दोनदा काळया पाण्याची शिक्षा सुनावली आणि ती त्यांनी भोगली आहे. दोनदा काळया पाण्याची अंदमानात भोगणारे सावरकर हे एकमेव स्वातंत्र्ययोध्दे आहेत. त्यामुळे विरोधकांना माझे आव्हान आहे की, त्यांनी केवळ 10-12 वर्षे, महिने नव्हे तर केवळ दहा तास अंदमानातील काळ कोठडीत घालवून दाखवावे. आम्ही पुरस्कार देऊन तुमचा सत्कार करु.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले आहे. आझाद हिंंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी प्रथम स्वतंत्र भारताचा झेंडा फडकविला. सावरकर आणि बोस यांच्या प्रेरणेतून नवा आणि शक्तिशाली भारत घडविण्याचे प्रयत्न सुुरु आहेत. त्यात तुमच्या पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे असेही फडणवीस म्हणाले. दुसरीकडे समाजात विध्वंसक वृत्तीला खतपाणी घातले जात आहेत. वातावरण दुषित करुन समाजात विविध पातळीवर फूट पाडली जात आहे. परंतु देश पातळीवर नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वामुळे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या सूत्रावर खंबीर वाटचाल सुरु आहे. 21 व्या शतकातील महान देश घडविण्यात देशातील तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे असेही फडणवीस म्हणाले.

उपप्राचार्य सत्यकाम पाठक, प्रा.मनिष देशपांडे, एल.के.कुलकर्णी, आनंद इनामदार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, विनायक नांदेडकर, गंगाधर जोशी, संतुक हंबर्डे, डॉ.धनाजीराव देशमुख, शामराव जहागीरदार, नवीनभाई ठक्कर, लड्डूसिंघ महाजन, सनतकुमार महाजन, कृष्णा देशमुख, सौ.अरुंधती पुरंदरे साले, मंजू पुरंदरे, दिलीपसिंघ सोडी, राजेश महाराज देगलूरकर, केरबा बिडवई, अ‍ॅड.पंडितराव देशमुख, अ‍ॅड.उत्तमराव टिकोरे, डॉ.अजित गोपछडे, संजय कौडगे, माजी विद्यार्थी नाथा चितळे, नौनीहालसिंघ जहागीरदार, कृष्णा उमरीकर, अ‍ॅड.आष्टीकर देशपांडे, निवृत्त प्राचार्य विद्यासागर जोशी, अ‍ॅड.चैतन्यबापू देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.दीपक कासराळीकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य सुधीर शिवणीकर यांनी केले. वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.