देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार!

devendra-fadnavis

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांत संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये या राज्यांमधील गेल्या पाच वर्षांतील सुशासन आणि विकास हाच भाजपचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे. आणि अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, मनोहर लाल खट्टर अणि रघुबीर दास हे पक्षातर्फे पुढील मुख्यमंत्रीपदाचे चेहरे असतील, असे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागीउमेदवार निवडून देण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते. तेच सूत्र कायम ठेवून पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, फडणवीस, खट्टर व दास या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यांच्या सरकारांची उत्तम कामगिरी हाच पक्षाचा विधानसभा निवडणुकांमधील प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळाल्यावर हेच तीन मुख्यमंत्री त्या पदांवर कायम राहतील हे उघड आहे.

फडणवीस, खट्टर व दास या तिघांनीही जनतेसमोर आपली स्वच्छ प्रतिमा ठेवली असून, भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. त्या- त्या राज्यांमधील सरकारांची उत्तम कामगिरी, केंद्रातील स्वपक्षीय मोदी सरकारने घेतलेले अनेक धाडसी निर्णय व विरोधी पक्षांमधील फाटाफूट या सर्वांचा फायदा घेऊन या तिन्ही राज्यांमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची भाजपला पक्की खात्री आहे. खास करून महाराष्ट्र व हरियाणात विरोधी पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्यानेही पक्षाला मोठी बळकटी मिळाली आहे.