फडणवीस, विखे-पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न, मात्र अण्णा उपोषणावर ठाम

Devendra Fadnavis

अहमदनगर :- नव्या कृषी कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला असून, उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 58 दिवसांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप (BJP) नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी इथं जाऊन भेट घेतली. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे म्हणाले.

दरम्यान, या भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचं मत आणि मागण्या जाणून घेतल्या. त्या केंद्र सरकारपुढे सादर करण्यात येईल. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. अण्णांचे विषय मार्गी लागावे ही आमचीही इच्छा आहे. अण्णांच्या पत्राचे उत्तर चर्चा करुन द्यावं लागतं त्यामुळे उत्तर दिलं नाही. अण्णांना उत्तर द्यायचं आहे, असं खुद्द केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER