राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; हिंदुत्वाच्या चळवळीतील तपस्वी आणि आदरणीय नेते – फडणवीस

Devendra Fadnavis-Balasaheb Thackeray

मुंबई :- आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून या निमित्ताने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेबांना अभिवादन करुन मत व्यक्त केले आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे नुसते नाव नाही, तर उत्साह आणि प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. राष्ट्रवादाचा निर्मळ झरा आहे. आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कधीही तत्त्वांशी तडजोड न केलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे म्हणूनच आम्हा सर्वांसाठी ऊर्जास्रोत आहेत, प्रेरणास्थान आहेत, मार्गदर्शक आहेत.

बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख (Shivsena) नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही. विचारांवर ठाम श्रद्धा आणि त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी यामुळे ते हिंदुत्वाच्या चळवळीतील तपस्वी आणि आदरणीय नेते बनले.

अगदी छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याला त्यांच्या बोलण्यातून ऊर्जा मिळायची. त्यांची ओजस्वी वाणी, घणाघाती प्रहार यांनी एक कालखंड गाजविला आणि आजही त्यांची भाषणे ऐकत राहावीशी वाटतात. आजही ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरित करतात. विचारनिष्ठा, स्वाभिमान आणि त्यासाठी प्रसंगी वाटेल त्या संकटाला तोंड देण्याची तयारी याबद्दल त्यांचे विचार ऐकत राहणे आणि त्यावर वाटचालीसाठी स्वत:ला संकल्पबद्ध करीत राहणे, अशी किमया फार कमी नेत्यांना साधता येते. स्व. बाळासाहेब हे त्यापैकी एक. म्हणूनच ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार सातत्याने प्रेरणा देत असतात आणि भविष्यातही देत राहतील.

राजकारणात छोट्या मनाचे अनेक नेते आपण पाहतो. पण, बाळासाहेबांचे मन राजासारखे होते. व्यापक आणि दूरदृष्टी त्यांच्या ठायी होती. त्यामुळेच महाराष्ट्रात निष्ठावंतांची एक मोठी फौज ते उभे करू शकले. त्यांच्या विचारांचा आधार, केंद्रबिंदू हा राष्ट्रीयत्वाचा होता. सत्तेसाठी, पैशासाठी कोणतीही तडजोड करू नका, असे ते सातत्याने सांगत, अशी आठवणही त्यांनी करुन दिली.

 

ही बातमी पण वाचा : शिवसैनिक, मनसैनिक आतुर ; बाळासाहेबांसमोर राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER