देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाही : भैय्याजी जोशी

नागपूर :- देवेंद्र फडणवीस हे फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही आणि ते फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाही. त्यांचे नशीब मोठे असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज येथे केले. फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नसून त्यांचे माजी मुख्यमंत्रीपद अल्पायु आहे. लोकशाहीत कमीजास्त घडतच असते असे ते म्हणाले.

राज्यात 77 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटीव्ह; चारजण निरीक्षणाखाली; आरोग्यमंत्री राजेश टोपे

विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केले तेव्हा देवेंद्र फडणवीस हेदेखील मंचावर उपस्थित होते. नागपुरात साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर जनमताचा कौल हा महायुतीलाच मिळाला होता. शिवसेना आणि भाजपात झालेला वाद विकोपाला गेला. त्यानंतर भाजपाने अजित पवारांची साथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथही घेतली. मात्र हे सरकार अवघे ७२ तास चालले. त्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांची साथ सोडल्याने फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.

महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर विरोधात बसण्याचा निर्णय भाजपाने घेतला. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते झाले. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस आपण दिल्लीला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ते म्हणाले होते, यानंतर महाराष्ट्रातच राहणार. मी मैदान सोडणाऱ्यांमधला नाही असे सांगत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता भय्याजी जोशी यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.