कोणत्याच चौकशीला घाबरत नाही : देवेंद्र फडणवीस; आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढा

मुंबई :- आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत प्रारंभ होत आहे. या पृष्ठभूमीवर, आज रविवारी भाजपाने पत्रपरिषद घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.

नितेश राणे यांनी केली मराठा आंदोलकांची झोपण्याची व्यवस्था

महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील अनेक योजनांची चौकशी करण्याचे ठरविले आहे. जलयुक्त शिवार आणि वृक्ष लागवड योजनेचा यामध्ये समावेश आहे. जलयुक्त शिवारच्या चौकशीचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, तर वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीचा निर्णय वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला आहे.

या संदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज म्हणाले, जलयुक्त शिवार योजना असो की वृक्षारोपण, आम्ही चौकशीस घाबरत नाही. खरे चित्र लोकांपुढे येण्यासाठी १९९९ ते २०१९ या कालावधीतील राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी आमची मागणी आहे. लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचे काम सध्या राज्य सरकार करीत आहे. सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद केली, तरी जनता ही योजना सुरूच ठेवेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.