पुढले मुख्यमंत्री फडणवीसच; शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय नंतर – अमित शहा

Amit Shah And CM

नवी दिल्ली : सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे पुढचा मुख्यमंत्री कोण?. कारण भाजप-शिवसेनेची युती झाली असली तरी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगलेला आहे. आणि आता त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ‘शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यायचं का, याचा विचार निवडणुकीच्या निकालानंतर करु, असं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. झी मीडियाचे समूह संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत अमित शाह यांनी विविध विषयांवर रोखठोक उत्तरं दिली.

ही बातमी पण वाचा:- पाच वर्षाचा मुलगाही सांगतो सरकार महायुतीचं येणार – देवेंद्र फडणवीस

त्याचबरोबर राष्ट्रवादीनं इक्बाल मिरचीशी असलेल्या संबंधांच्या आरोपांचा खुलासा करावा, असं आव्हानही अमित शहा यांनी शरद पवारांना दिलं आहे.

‘महाराष्ट्रात एनडीएचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. महाराष्ट्रात एनडीएला बहुमत मिळेल असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.’ शिवसेना महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा दावा करत आहे यावर उत्तर देताना अमित शहा यांनी म्हटलं की, ‘महाराष्ट्रात एनडीएचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील.’

महाराष्ट्रात शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल का यावर बोलताना अमित शहा यांनी म्हटलं की, ‘याचा निर्णय हा निवडणुकीच्या निर्णयानंतर घेतला जाईल.’ पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असा दावा शिवसैनिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केला जात आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यानंतर तुमचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे यावर उत्तर देतांना अमित शहा यांनी म्हटलं की, ‘पंतप्रधान मोदी हे यापुढेही अनेक वर्ष सरकार चालवतील. मोदी यांच्यानंतर माझ्या नावाची चर्चा नाही. पक्षात माझ्या पेक्षाही अनेक जेष्ठ नेते आहेत.’