आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीच्या दृष्टीने शहराचा विकास : महापौर

tejaswini bus lokarpan

नागपूर :- नागपूर शहरातील महिलांसाठी विशेष बस सेवा असावी या संकल्पनेतून आज शहरातील महिलांसाठी ‘तेजस्विनी बस’ सुरू करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण या सर्वांसाठी विविध योजनांमार्फत कार्य केले जात आहे. संपूर्ण देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी वाहने इलेक्ट्रिकवरील धुररहित असावित या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेची पूर्ती आज तेजस्विनी इलेक्ट्रिक बस व चार्जिंग स्टेशनच्या रुपाने होत आहे. पेट्रोल डिझेलचा वापर टाळून इलेक्ट्रिक वाहनांद्वारे आज आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीच्या दृष्टीने शहराच्या विकास होत आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २३ अंतर्गत लकडगंज स्माल फॅक्ट्री एरिया, पूर्व नागपूर येथे उभारण्यात आलेल्या ‘मातृशक्ती इलेक्ट्रिक बस आगार व चार्जिंग स्टेशन’चे बुधवारी (ता.११) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते उद्घाटन तथा लोकार्पण झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन महापौर नंदा जिचकार बोलत होत्या.

मंचावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सदस्या वैशाली रोहनकर, रुपाली ठाकुर, विशाखा बांते, सदस्य नितीन साठवणे, राजेश घोडपागे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते आदी उपस्थित होते.

शहरात विमानतळावर तसेच कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आहेत. कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सुमारे ६०० वाहने चार्ज करता येतील एवढ्या क्षमतेचे चार्जिंग स्टेशन आहेत. यामध्ये आता मातृशक्ती ई-बस आगारची भर पडली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डिझेलमुक्त वाहनांच्या संकल्पनेला ही मोठी साथ असून लवकरच मनपातील वाहने सीएनजीवर परिवर्तीत करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात शहरात इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणा-या पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे मनपाच्या परिवहन विभागावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा आपली बसच्या ताफ्यात समावेश करण्यात आल्याने ई-बस संचालन व ई-चार्जिंग स्टेशन हा मनपाच्या दृष्टीने उत्तम प्रकल्प आहे, असे प्रतिपादन पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.