देवदत्त पडीक्कलची शतकांच्या हॅट्ट्रिकसह धावांची बरसात

Devdutt Padikkal

गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये,(IPL 2020). जे काही मोजके नवोदीत खेळाडू चमकले होते त्यात देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal) हे एक नाव होते. रॉयल चॕलेंजर्स बंगलोरसाठी (RCB). सलामीला खेळताना त्याने धमाल केली होती आणि आयपीएल 2020 मधील आपले हे यश फ्लूक नव्हते हे तो आता सिध्द करतोय. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) सामन्यांमध्ये कर्नाटकच्या (Karnataka) या सलामी फलंदाजाची बॕट चांगलीच तळपतेय. त्याने 5 डावात लागोपाठ तीन शतकी खेळी करून 572 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या पाचही डावात त्याने अर्धशतकाच्यावर खेळी केल्या आहेत आणि मयांक अगरवालचा 2017- 18 मधील 723 धावांचा विक्रम तो मागे टाकेल अशी चिन्हे आहेत. गेल्या वर्षीसुध्दा त्यानेच सर्वाधिक 609 धावा करताना कर्नाटकच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही त्याने 12 सामन्यात सर्वाधिक 580 धावा केल्या होत्या.

यंदा त्याने उत्तर प्रदेशविरुध्द 52, बिहारविरुध्द 97, ओडिशाविरुध्द 152, केरळविरुध्द नाबाद 126 आणि रेल्वेविरुध्द नाबाद 145 धावांच्या खेळी केल्या आहेत. ह्या त्याच्या खेळी पाहता तो जबरदस्त फाॕर्मात आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

आपल्या शतकांची हॅट्ट्रिक रेल्वेविरुध्द साजरी करताना त्याने 9 चौकार व 9 षटकारांसह 125 चेंडूतच 145 धावा तडकावल्या. यामुळेच कर्नाटकने 10 गडी राखून विजय मिळवला. कर्णधार समर्थ राजकुमार सोबतच्या त्याच्या 285 धावांच्या सलामीने एकही गडी न गमावता सर्वाधिक लक्ष्य गाठण्याचा नवा विक्रम केला.

त्याआधी केरळवरील 9 गडी राखून विजयातही त्याच्या 13 चौकार व दोन षटकारांसह नाबाद 126 धावा होत्या. त्या सामन्यातही त्याने के. सिध्दार्थसोबत नाबाद 180 धावांची भागिदारी केली होती. ओडिशाविरुध्दच्या 152 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. त्यातही त्याने कर्णधार समर्थसोबत 99 धावांची भागिदारी करुन कर्नाटकचा विजय साकारला होता.

यंदाच्या हजारे ट्रॉफी स्पर्धेत तो 5 सामन्यात 572 धावांसह आघाडीवर असून दुसऱ्या स्थानावरील हैदराबादच्या तन्मय अगरवालपेक्षा या धावा 126 ने अधिक आहेत. अगरवालच्या 446 धावा आहेत..कर्नाटकचा कर्णधार समर्थ 413 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER